Published On : Sun, Dec 26th, 2021

सत्य, अहिंसा व मानवतेच्या प्रसाराचे कार्य चक्रधर स्वामींनी केले : ना. गडकरी

Advertisement

पारशिवनीत दत्तजयंती व भागवत सप्ताह

नागपूर: श्री. चक्रधर स्वामींच्या काळात राज्यात 1650 तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. स्वामींनी सत्य, अहिंसा व मानवतेच्या प्रसाराचे कार्य केले. त्या काळात महानुभाव पंथांच्या भाविकांची संख्याही वाढली. महानुभाव पंथाच्या या संस्कारातून अनेकांनी जीवनव्रती म्हणून या विचाराच्या प्रसारासाठी आपले जीवन दिले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

पारशिवनी येथे सुधाकर मेंघर यांच्यातर्फे आयोजित दत्तजयंती व भागवत ज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान ना. गडकरी बोलत होते. पारशिवनी येथील दत्त टेकडी येथे हा कार्यक्रम झाला. यानिमित्त प्रवचनकार चिरडे बाबा यांच्या श्रीमद् भागवत कथेचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष जयस्वाल, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, कमलाकर मेंघर व पंथाचे शेकडो अनुयायी यावेळी उपस्थित होते
.

आपला इतिहास, संस्कृती, परंपरा व विचार खूप मोठे आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- जीवनमूल्यांचा अर्थ श्री चक्रधर स्वामींनी समजावून सांगितला. ही जीवनमूल्येच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. सत्य, अहिंसा, सेवाभाव ही सर्व मूल्ये शिक्षणातून, लोकप्रबोधनातून आणि महंतांच्या विचारातून आपल्याला मिळत असतात. हा वैचारिक यज्ञ असून या माध्यमातून समाजाच्या संस्कारित करण्याचे मोठे काम होते आहे.

आज श्री. चक्रधर स्वामीचे 800 वे जयंती वर्ष साजरे केले जात आहे. अशा आयोजनांमुळे या भागाचे वातावरण बदलले आहे. या यज्ञामुळे जीवन जगण्याची प्रेरणा आणि विचार मिळेल असेही ना.गडकरी म्हणाले.