Published On : Mon, Nov 12th, 2018

छठ पूजा व्यवस्था कार्याचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

Advertisement

नागपूर : उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. अंबाझरी तलाव घाटावर लाखो भाविक सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात. या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्था कार्याचे भूमिपूजन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेविका रूपा रॉय यांच्यासह बहुराष्ट्रीय छठ व्रत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, छठ व्रत पूजेमध्ये केवळ उत्तर भारतीय नागरिकच नव्हे तर नागपुरातील नागरिक आस्थेने सहभागी होतात. हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव ठरत आहे. अर्घ्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी तलावावर येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यंदा पूजा ठिकाणाच्या परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे भाविकांना अडथळा होणार नाही, याची पूर्ण काळजी नागपूर महानगरपालिका प्रशासन घेईल, असेही त्या म्हणाल्या. भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांसोबतच भाविकांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात येईल. तसे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. छठ पूजेच्या दिवशी पहाटे तलावावर भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे आवश्यक ती प्रकाशव्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

छठ पूजेच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा तलाव येथे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटिंग, संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था सार्वजनिक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, स्वागत कक्ष, श्रद्धाळूंना पूजा व्यवस्थेसाठी सुरक्षित घाटांचे अस्थायी निर्माण आदी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कार्यामुळे अंबाझरी परिसरातील अडथळा नागपूर मेट्रो प्रशासनाच्या सहकार्याने दूर करण्यात आला.

छठ पूजा पर्वाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महानगरपालिका दरवर्षी १० लाख रुपयांच्या निधीचे नियोजन करते. कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाची आपात्‌कालिन यंत्रणा तत्पर राहील, मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात नगरसेविका रूपा राय आणि अतिरिक्त उपायुक्त महेश मोरोणे सांभाळीत आहेत. छठ माता पूजा विधी आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यात येईल त्या दिवशी छठ व्रतस्थांच्या स्वागतासाठी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे उपस्थित राहतील.