Published On : Thu, Oct 18th, 2018

राम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा- मोहन भागवत

नागपूर: कोणत्याही मार्गानं अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. यासाठी सरकारनं कायदा करायला हवा, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. राम फक्त हिंदूंचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे राम मंदिराची उभारणी व्हायलाच हवी. राम मंदिराची उभारणी झाल्यावर देशात सद्भावनाचं वातावरण निर्माण होईल, असं सरसंघचालकांनी म्हटलं. ते विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांना संबोधित करत होते.

राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारनं कायदा करायला हवा. कोणत्याही मार्गानं राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. मात्र राम मंदिर बांधलं गेलंच पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करताना म्हणाले. यांची केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिराची उभारणी का केली जात नाही, असा प्रश्न लोकांना पडतो, असंदेखील त्यांनी म्हटलं. मतदार केवळ एक दिवसाचा राजा असतो. त्यामुळे त्यानं नीट विचार करुन मतदान करायला हवं. अन्यथा त्या एका दिवसामुळे पाच वर्षे सहन करावं लागू शकतं, असं सरसंघचालक म्हणाले.

भारत पंचामृताच्या मंत्राच्या आधारे पुढे गेला, तर नक्की महागुरू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोणीही आमचं शत्रू नाही. आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही. मात्र जगातील अनेकजण आम्हाला शत्रू मानतात, असं सरसंघचालक म्हणाले. पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झालं. मात्र त्यांच्या कृती आणि कारवायांमध्ये फरक पडलेला नाही. कोणीही आपल्यावर हल्ला करण्याचा विचारसुद्धा करु शकणार नाही, इतकं सामर्थ्यशाली आपण व्हायला हवं, असं सरसंघचालक भागवत यांनी म्हटलं.