Published On : Mon, Apr 8th, 2019

सीमेंट रस्त्यांच्या विळख्यातील झाडे घेणार मोकळा श्वास!

Advertisement

ग्रीन व्हिजीलच्या मुद्यावर मनपा आयुक्तांचा निर्णय

नागपूर : सीमेंट रस्त्यांमुळे चोक झालेल्या झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने या झाडांना मोकळे करा. अगदी झाडाला लागून असलेल्या सीमेंट रस्त्यांची कटिंग करून झाडे डिचोकिंग करा, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सीमेंट रस्त्यांमुळे नागपूर शहरातील अनेक झाडांचा श्वास गुदमरला. अनेक झाडे चोक झालीत. यामुळे त्यांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली. अशा परिस्थितीत या झाडांना जीवनदान दिले नाही तर नागपूर शहरातील अनेक झाडे उन्मळून पडतील. हा मुद्दा ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून दिला.

मुद्याचे गांभीर्य ओळखून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी उपस्थित होते. सीमेंट रस्ते हा नागपूरच्या विकासाचा भाग आहे. मात्र, कंत्राटदारांनी सीमेंट रस्त्यालगत असलेल्या झाडांभोवतीही सीमेंटचे आवरण टाकले.

यामुळे झाडांना पाणी देता येत नाही किंवा पावसाचे पाणी जमिनीत जात नाही. या परिस्थितीमुळे झाडांची मुळे कमजोर होऊन वादळी हवेत झाडे उन्मळून पडण्याची शक्यता बळावली असल्याची माहिती श्री. कौस्तभ चॅटर्जी यांनी दिली. यावेळी श्री. चॅटर्जी यांनी सादरीकरणाच्या माध्यमातूनही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी या मुद्याची गांभीर्याने दखल घेत तातडीने अशी झाडे मोकळी करण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर यापुढील काळात जी सीमेंट रस्ते निर्माणाधीन आहेत, त्या मार्गातील झाडांभोवती जागा सोडून काही अंतरावरून बांधकाम करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.