Published On : Sat, Oct 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ग्रामीणमध्ये १८ शहरांत सीसीटीव्हीचे जाळे उभारणार; १३६ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Advertisement

नागपूर ग्रामीणमध्ये १८ शहरांत सीसीटीव्हीचे जाळे उभारणार; १३६ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

नागपूर : नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील १८ शहरांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याच्या गृह विभागाकडून १३६ कोटी २९ लाख ९२ हजार ४३३ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शहरी भागांच्या सुरक्षेला मोठे बळ मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या आराखड्यात १५ शहरांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत काटोल, सावनेर आणि वडोदा या तीन शहरांचा अतिरिक्त समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी १९ ऑक्टोबर रोजी सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवला. या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दिल्याने आता एकूण १८ शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या यंत्रणेमुळे शहरातील प्रमुख ठिकाणांवर सतत नजर ठेवणे शक्य होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास पोलिसांना मदत होईल. एखादी गुन्हेगारी घटना घडल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेणे आणि तपासाची प्रक्रिया जलद करणे अधिक सोपे होणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाचे नियंत्रक अधिकारी म्हणून नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांची सुरक्षितता वाढवणे, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

या १८ शहरांमध्ये उभारणार सीसीटीव्ही यंत्रणा-

उमरेड, बुटीबोरी, कन्हान-पिपरी, रामटेक, नरखेड, कळमेश्वर, खापा, मोवाड, मौदा, भिवापूर, पारशिवनी, कुही, कांद्री, कोंढाळी, मोहपा, काटोल, वडोदा आणि सावनेर या शहरांचा प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

या सीसीटीव्ही प्रकल्पामुळे नागपूर ग्रामीणमधील शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना तंत्रज्ञानाची प्रभावी साथ मिळणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.