नाणार भूमी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करा – शिवसेना

नागपूर : आज सलग दुसऱ्या दिवशीही कोकणात प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये विधानसभेच्या सभागृहात खडाजंगी उडाली. नाणार येथे होऊ घातलेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे यासह भूमीअधिग्रहणाची नोटीस सरकारने त्वरित रद्द करावी अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.

विधानसभेत आज मुख्यमंत्रयांनी निवेदन देताना नाणार प्रकल्प हा लादणार नाही असे जाहीर केले होते. ९७ टक्के लोकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने ३२ / १ भूमी अधिग्रहणाची नोटीस मुख्यमंत्र् यांनी त्वरीत रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भूमी अधिग्रहणाची नोटीस रद्द करण्याची फाईल मुखमंत्र्यांनी पाठविली असून त्यावर स्वाक्षरी करून ही नोटीस रद्द करावी, शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.