Published On : Fri, Mar 27th, 2020

तुम्ही हाक द्या, आम्ही सेवेत हजर राहू

महापौर संदीप जोशी यांची भावनिक साद : ‘फेसुबक लाईव्ह’ मधून दिली नागपूरकरांच्या प्रश्नांना उत्तरे


नागपूर : नागपुरात बाहेर राज्यातील अनेक जण ‘लॉकडाऊन’मध्ये अडकले आहेत. बाहेरगावचे विद्यार्थी अडकून आहेत. त्यांच्या भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना, लोकांनी माझ्या स्वीय सहायकाला फोन करावा. ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी घातली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ‘लॉकडाऊन’ आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्वांना घरात राहायचे आहे. पण यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागपूर शहराचे प्रथम नागरिक म्हणून नागरिकांच्या शंकांचे निरसन करायचे या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून तब्बल एक तास नागरिकांशी संवाद साधला. या काळात नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. नागपूर शहरात जी बाहेरगावची लोकं अडकली आहेत, त्यांना कुठलीही अडचण असेल तर त्यांनी महापौर ॲप, त्यावरील वॉटस्‌ॲप क्रमांकावर अथवा स्वीय सहायकाच्या क्रमांकावर मदतीची माहिती द्यावी. तातडीने त्याची दखल घेतली जाईल. नागरिकांनी घरीच राहावे. विनाकारण बाहेर पडू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी व्यवस्था करीत आहे. किराणा सामान, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळावे, यासाठी प्रत्येक परिसरातील विक्रेत्यांची, दुकानांचे नावे, मोबाईल क्रमांकासह मनपाच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. नागरिकांनी या विक्रेत्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून जे हवे आहे, ते घरपोच मागवावे, असे आवाहन त्यांनी केले.

जे व्यक्ती अडकले आहेत, त्यांना बाहेरगावी जाण्यासाठी मात्र कुठलीही मदत करता येणार नाही. त्यांनी आहे तेथेच १५ एप्रिलपर्यंत राहून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, संपूर्ण शहरात फॉगिंग व्हावे, यासाठी आवश्यक ते निर्देश मलेरिया, फायलेरिया विभाग आणि झोन कार्यालयांना देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

आयुक्त फिरतात आपण का फिरत नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, आपण फिरलो तर विनाकारण गर्दी जमा होईल. ते टाळावे म्हणून आपण फिरणे टाळतोय. मात्र तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जाऊन, रुग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आता उद्यापासून आपण आपल्या गाडीवर स्वत:च्या आवाजात नागरिकांना आवाहन करीत फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोरोना’ हा संसर्गजन्य रोग आहे. झपाट्याने याचा प्रसार होतो आहे. नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने तो वेगाने पसरतो. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठीच संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे आपण पुढील काही दिवस पाळले तर भविष्यात होणारा मोठा धोका टाळू शकतो. म्हणून नागरिकांनी शासनाचे निर्देश पाळावे. घरीच थांबावे. काळजी घ्यावी. घरपोच सेवांचा लाभ घ्यावा. काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अथवा मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी ‘फेसबुक लाईव्ह’दरम्यान केले.

३१ मार्चला साधणार संवाद

चार दिवसानंतर पुन्हा महापौर संदीप जोशी नागरिकांशी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. ३१ मार्च रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत फेसबुकच्या माध्यमातून ते पुन्हा नागरिकांच्या भेटीला येतील. यादरम्यान, नागरिकांना काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर त्यांनी थेट प्रक्षेपण समयी इनबॉक्समध्ये करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.