
नागपूर -जिल्ह्यातील कामठी तालुक्यात खैरी, गुमथळा आणि तरोडी बुजुर्ग या तीन ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणुका संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रभाग क्रमांक २ अंतर्गत घेण्यात येणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तहसील कृषी कार्यालय, कामठी येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज स्वीकृतीची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी निश्चित करण्यात आली आहे.
१४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदानाची वेळ २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी प्रभाग क्रमांक २ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, मतमोजणीही त्याच दिवशी म्हणजे २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून कामठी तहसील कार्यालयात सुरू होणार असून निकाल जाहीर होईपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे.कामठीचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करत नागरिकांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.








