राजस्थान ला निघालेल्या ४० वाट्सरूंची केली जेवणाची व्यवस्था
नागपूर:- आदीलाबाद येथून काल रात्री (दि २७ मार्च) राजस्थान येथे जाण्याकरिता पायदळ निघालेल्या चाळीस लोकांना बुटीबोरी येथे पोहचले असता बुटीबोरी पोलीसांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून जपली सामाजिक बांधिलकी.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या जीवघेण्या परिस्थितीत या विषाणूचा संसर्ग देशभर होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित केले.त्यामुळे हे ४० राजस्थानी कामगार आदीलाबाद येथे अडकले होते.काम बंद असल्यामुळे ठेकेदार कामगारांना पगार ही देत नव्हता.त्यामुळे हातावर आणणे आणि पानावर खाणाऱ्या या ४० कामगारांना “जगावे की,मरावे” हेच कळत नसल्यामुळे त्यांनी आपल्या गावी राजस्थान ला जाण्याचे ठरविले.परंतु लॉक डाऊन असल्यामुळे सर्व दळणवळणाची सुविधाही बंद अशा परिस्थितीत त्यांनी पायदळ जाण्याचे ठरवत शुक्रवार दि २७ मार्च ला रात्री ८ वाजता पासून आपला पायदळ प्रवास सुरु केला.
रस्त्यात त्यांना एक ट्रक मिळाला तेव्हा त्यांनी ट्रक चालकाला विनंती केली असता त्याने त्या सर्वांना ट्रक मध्ये बसू दिले.या ४० लोकांना घेऊन निघालेला ट्रक आज दि २८ मार्च ला दुपारी १ वाजता दरम्यान पोहचला असता बुटी बोरी पोलिसांनी ट्रक ला तपासणी करण्या करिता थांबविले असता या ४० कामगारांनी आपली व्यथा पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी त्या कामगारांची व्यथा ऐकताच त्यांचेही हृदय पाणावले.बुटी बोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचे मार्गदर्शनात त्यांनी या दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या ४० कामगारांची बुटीबोरी येथील मुख्य चौकात भोजनाची व्यवस्था केली.सर्व कामगारांनी बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे साश्रु नयनांनी आभार व्यक्त करून पुढील प्रवासाला रवाना झाले.