
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम आजपासून अधिकृतपणे सुरू झाला आहे. २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
राज्यातील या निवडणुकांसोबतच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी महायुती भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रचारयंत्रणा सज्ज केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष अद्याप अंतिम निर्णयप्रक्रियेत आहेत. त्यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीसाठी मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडेल. यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात निवडणुकीचा उत्साह आणि राजकीय प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.










