Published On : Mon, Feb 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत !

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजता विधान परिषद तर दुपारी 12 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालेल. या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे या अधिवेशनादरम्यान विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. हा मुद्दाही या अधिवेशनात चांगलाच गाजणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, केंद्र सरकारने हटवलेली कांदा निर्यातबंदी, राज्याच्या अनेक भागात पाण्याची समस्या, भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांचे खून प्रकरण, पुण्यात सापडलेला हजारो कोटी रुपयांचा अंमली पदार्थ साठा यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान 27 फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर लगेच दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज तसेच लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लेखानुदान प्रस्ताव आणि लेखानुदान विनियोजन विधेयकाला मान्यता देण्यात येणार आहे.

Advertisement