Published On : Sat, May 19th, 2018

बुद्धांचा शांतीचा संदेश सर्व जगासाठी मार्गदर्शक : रामदास आठवले

MP Ramdas Athawle

नागपूर: तथागत गौतम बुद्ध यांच्‍या शांती व अहिंसा या मार्गाचा सर्व जगाने स्‍वीकार केला असून त्यांचा विश्‍वशांतीचा संदेश हा जगासाठी मागदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपूर येथे केले. महाराष्‍ट्र शासनाचा सामाजिक न्‍याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) व समता प्रतिष्‍ठान नागपूर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय वैशाख दिन (बौद्ध पौर्णिमा निमित्‍त) स्‍थानिक सुरेश भट सभागृहात 19 व 20 मे रोजी आयोजित ‘आंतरराष्‍ट्रीय शांति व समता’ परिषदेचे उद्घाटनसत्राप्रसंगी ते विशेष अतिथी म्‍हणून बोलत होते.

या प्रसंगी महाराष्‍ट्राच्‍या सामाजिक न्‍याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, पशुसंवर्धन व दुग्‍धविकास मंत्री महादेव जानकर, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने,सर्वश्री आमदार डॉ. मिलिंद माने, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, राष्‍ट्रीय मागासवर्ग आयोगाच्‍या सदस्‍या अॅड. सुलेखा कुंभारे, शिक्षणतज्ञ डॉ. विश्वनाथ कराड प्रामुख्‍याने उपस्थित होते.

नागपूर ही ऐतिहासिक भूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी पवित्र दीक्षाभूमीत बौद्ध धर्माची दीक्षा आपल्‍या लाखो अनुयायांना दिली. देश-विदेशातील बुद्धिस्ट विचारवंत तसेच शांततेचा पुरस्‍कार करणारे सर्वधर्मीय धर्मगुरू, तत्‍ववेत्‍ते या नागपूर नगरीमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय शांती व समता परिषदेच्‍या माध्‍यमातून एकत्र आले, ही बाब अभिमानास्‍पद असल्‍याचे आठवले यांनी याप्रसंगी सांगितले.

याप्रसंगी महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशामधून या आंतरराष्‍ट्रीय परिषदेच्‍या आयोजनासाठी नागपूर शहराची निवड केल्‍याबद्दल आयोजकांचे आभार मानले. जगात अराजकता व अशांततेचे वातावरण असतांना बुद्‌धाच्या धम्‍मक्रांतीने प्रस्‍थापित झालेली शांती व समता या परिषदेद्वारे जगभर पसरेल, असे आपल्‍या संदेशात फडणवीस यांनी सांगितले.

Rajkumar Badole

बुद्धांच्या तत्‍वज्ञानाच्‍या अनुसरणाने जगभर प्रज्ञा, शील व करूणा यांचा संदेश पोहचेल, अशी आशा प्रास्‍ताविकपर भाषणात सामाजिक न्‍याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्‍यक्‍त केली.

या परिषदेच्‍या उद्घाटनाप्रसंगी प्रसिद्ध शिक्षणतज्‍ज्ञ डॉ. विश्‍वनाथ कराड, खासदार तुमाने, अॅड. सुलेखा कुंभारे,आचार्य लोकेश मुनी व महाराष्‍ट्राचे पशुसंवर्धन व दुग्‍धविकास मंत्री महादेव जानकर यांनीही आपले विचार या परिषदेचे प्रसंगी मांडले. परिषदेदरम्‍यान भिख्‍खू संघाचे स्‍वागत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. बांग्‍लादेश, श्रीलंका, दक्षिण कोरीया,थायलंड, भुतान, फिलीपाईन्‍स, लद्दाख तसेच लंडन येथील भंते याप्रसंगी उपस्थित होते.

या परिषदेला सामाजिक न्‍याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे,सामाजिक न्‍याय विभागाचे आयुक्‍त मिलींद शंभरकर, समता प्रतिष्‍ठानचे पदाधिकारी, आंतरराष्‍ट्रीय प्रतिनिधी तसेच नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
19 व 20 मे रोजी आयोजित परिषदेत विविध भंते, विचारवंत यांच्‍या वैचारिक व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले असून रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी या मार्गावर विश्वशांती रॅलीही निघणार आहे. थायलंड व म्यानमार येथील कलावंत नृत्‍याचे सादरीकरण,तसेच दीक्षाभूमी येथे नेपाळी कलाकाराचा सांस्‍कृतिक कार्यक्रम व अंगुलीमाल या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे.