Published On : Mon, Aug 2nd, 2021

मातंग समाजाच्या उत्थानासाठी ‘बसपा’च पर्याय – ताजने

Advertisement

मुंबई– ‘गरिबी नष्ट करता येऊ शकते. पंरतु, जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.’ असा संदेश समाजाला देणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्वप्नानूसार दलित, आदिवासी, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केवळ बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा सुश्री बहन मायावती च करू शकतात. म्हणूनच राज्यातील मातंग समाजाने बसपा सोबत उभे राहीले पाहिजे, असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी रविवारी केले.

अँड.ताजने यांच्या हस्ते सुमन नगर,चेंबुर येथील लोकशाहीर उद्यानामध्ये असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रदेश महासचिव रामसुमेर जैस्वार, प्रदेश सचिव नागसेन माला, मुंबई प्रभारी सुरेश महाडिक, श्यामलाल जैस्वार, कपिल बनसोडे, मुंबई अध्यक्ष प्रवीण धोत्रे, महिला अध्यक्ष पायल खरे तसेच सर्व विधानसभा मतदार संघातील पार्टीचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना अँड.ताजने म्हणाले की, राज्यातील अनेक पक्ष अण्णा भाऊ साठेंच्या नावावर राजकारण करतात. त्यांचे नाव घेतात. पंरतु, खऱ्या अर्थाने त्यांचे सन्मान करण्याचे काम एकाही पक्षाने केलेले नाही. लोकशाहीरांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना वाटेगाव या त्यांच्या मुळगावी बसपानेच घर बांधून दिले. अण्णा भाऊ साठेंच्या नावावर राजकीय पक्ष मतांचा जोगवा मागतात. पंरतु, त्यांच्या कुटुंबियांचे उत्थान ते करू शकले नाही. उलटपक्षी बसपाने कुठेही सरकार नसताना राज्य कार्यकारिणीच्या वतीने त्यांना घर बांधून दिले, असे अँड. ताजने म्हणाले.

साहित्यक्षेत्राने इथल्या दलित,तळागाळातील शोषित पीडित माणसाला नायकत्व बहाल केले नाही.पंरतु,गाव-कोसाबाहेरील माणसाला कथा, कादंबर्यामध्ये नायकत्वप्रदान करण्याचे काम अण्णा भाऊ साठेंनी केले. अण्णा भाऊ साठे यांनी दलित माणसाचा चेहरा त्याचे कर्तृत्व, कथा, कथानकांमधून मांडण्याचे काम केले. हे आतापर्यंतच्या साहित्यात झाले नाही आणि आताही होतांना दिसन नाही, अशा शब्दात अँड. ताजने यांनी भावना व्यक्त केली.