
नागपूर : शहरातील अजनी परिसरात बुधवारी उशिरा रात्री एका २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाची ओळख सागर सलामे (वय २२) अशी झाली असून तो सक्करदरा येथील वंजारी लेआउट परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा अजनी परिसरात सागरवर अज्ञात आरोपींकडून हल्ला करण्यात आला. हल्ला इतका क्रूर होता की त्यात सागरचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी हत्या गुन्हा नोंद करण्यात आला असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, ही हत्या जुन्या वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे नागपूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.








