Published On : Mon, Aug 21st, 2017

खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर कोसळली दरड

लोणावळा: मुंबई-पुणे रेल्वे मार्गात पुन्हा विघ्न आले आहे. खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ ही दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातानंतर हुबळी एक्स्प्रेस एक तास उशिरानं धावत आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावरुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर खंडाळा व कर्जत दरम्यान मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना पहाटे 5.30- 6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळील डोंगरावरुन दरड एक्स्प्रेसवर कोसळली. यावेळी भीषण असा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली.

मात्र वेळेतच एक्स्प्रेस थांबवण्यात आली व दरड हटवल्यानंतर काही वेळाने हुबळी एक्स्प्रेस आपल्या मार्गाकडे रवाना करण्यात आली. दरम्यान, जखमी प्रवाशांवर कर्जत येथील रेल्वे दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.