Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Tue, Feb 13th, 2018

भारत- ईस्त्राइल मैत्री संबंधावर आधारित ‘नमस्ते शलॉम’ मासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई: ‘नमस्ते शलॉम’ या मासिकाच्या माध्यमातून भारत आणि ईस्त्राइल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी खासदार व मासिकाचे संपादक तरूण विजय, ईस्त्राइलचे मुंबईतील वाणिज्यदूत अकौव्ह उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि ईस्त्राइल या दोन राष्ट्रांना एकत्र ठेवण्यासाठी दोन्ही देशांच्या समुदायातील भावनिक बंध अधिक घट्ट आहे. हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या ईस्त्राइल दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात आले. असाच प्रतिसाद भारतातील नागरिकांनी देखील ईस्त्राइलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना नुकत्याच झालेल्या दौऱ्याच्या वेळी दिला. ‘नमस्ते शलॉम’ मासिकाच्या उपक्रमाचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ईस्त्राइलने कृषि व जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या तंत्रज्ञानामुळे कृषि क्षेत्रात क्रांती झाली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या मासिकाच्या माध्यमातून ह्या तंत्रज्ञानाविषयीचे आदानप्रदान भारतासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. दोन्ही राष्ट्रांच्या समुदायासाठी हे मासिक उत्तम व्यासपीठ ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ईस्त्राइल दौऱ्यातील आठवणींना मुख्यमंत्र्यांनी यावेळी उजाळा दिला.

यावेळी अमृता फडणवीस यांनी ‘नमस्ते- शलॉम..हम सबका इंडिया…’ ह्या भारत आणि ईस्त्राइल मैत्री गीताच्या ओळी गायल्या. यावेळी ईस्त्राइलचे वाणिज्यदूत अकौव्ह यांनी मनोगत व्यक्त केले

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145