Published On : Fri, Mar 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; ईमेलमुळे खळबळ, पोलिसांची धावपळ!

Advertisement

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धमकीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता मुंबई प्रेस क्लबला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी सुमारे ७.३३ वाजता पाठवण्यात आलेल्या या ईमेलमध्ये प्रेस क्लबच्या परिसरात गॅस बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक आणि निवारण पथक (BDDS) तसेच श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील हालचालींवर निर्बंध ठेवण्यात आले असून कोणतीही धोकादायक वस्तू आढळली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राथमिक तपासात हा ईमेल “नीरजा अजमल खान” या नावाने पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. सायबर माध्यमातून पाठवलेल्या या धमकीचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून प्रोटॉन मेलच्या माध्यमातून पाठवलेल्या ईमेलचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बुधवारी BKC Passport Office येथेही बॉम्बची धमकी देण्यात आली होती. ईमेलद्वारे पाठवलेल्या या धमकीत कार्यालयात आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइडने भरलेले १९ बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता, तसेच ते दुपारी १.३० वाजता स्फोट करतील असे नमूद करण्यात आले होते.

Advertisement

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसर रिकामा करून सखोल तपासणी केली. मात्र, कोणतेही स्फोटक साहित्य आढळून न आल्याने अधिकाऱ्यांनी दिलासा व्यक्त केला. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ईमेल आयडींचा तपास सुरू असून संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली जात आहे.

सध्या दोन्ही घटनांमुळे मुंबईत सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.