नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या यंदाच्या उन्हाळी परीक्षेत मोठी घोडचूक झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) एमएससी फॉरेन्सिक सायन्स सेमिस्टर 2 च्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर 1 चा पेपर देण्यात आला होता. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी त्याची तात्काळ दखल घेतली. त्यानुसार पेपर मागे घेण्यात आला.
एमएससी फॉरेन्सिक सायन्सच्या सेमिस्टर 2 चा ‘क्रिमॅनॅलिस्टिक्स’ हा पेपर मंगळवारी दुसऱ्या सत्रात 2.30 ते 5.30 दरम्यान होणार होता. नंदनवनचे महिला महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असलेल्या या परीक्षेला एकूण 22 विद्यार्थी बसले होते. पेपर ऑनलाइन पाठवून त्याची प्रिंट आऊट प्रणालीनुसार परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. प्रणालीनुसार, महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी प्रिंटआऊट्स घेऊन विद्यार्थ्यांना पेपरचे वाटप केले.
पेपर पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की हे प्रश्न पहिल्या सेमिस्टरचे आहेत. त्यांनी ही बाब तातडीने केंद्राच्या प्रभारींच्या निदर्शनास आणून दिली. कॉलेजने RTMNU परीक्षा विभागाला कळवले आणि विद्यापीठाच्या सूचनेनुसार पेपर मागे घेण्यात आला.
डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना या घटनेची पुष्टी केली. हे प्रकरण फॉरेन्सिक सायन्सच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या अध्यक्षांकडे पाठवले जाईल, असे साबळे म्हणाले. अध्यक्षांच्या मतानुसार फेरपरीक्षा घेतली जाऊ शकते.
प्रणालीनुसार, पेपर सेट करण्यासाठी अध्यक्षांद्वारे एक टीम तयार केली जाते. पेपर सेट केल्यानंतर, तो मॉडरेशनसाठी पाठविला जातो आणि नंतर तीन संच तयार केले जातात. त्यापैकी एक संच विद्यार्थ्यांना देण्यासाठी निवडला जातो. तज्ञांच्या मते, पेपर सेटरने पहिल्या सेमिस्टरच्या पुस्तकांमधून प्रश्न घेतले असतील, परंतु मॉडरेटरलाही चूक लक्षात आली नाही. या प्रकरणात पेपर सेटर आणि मॉडरेटर दोषी आढळल्यास विद्यापीठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई करू शकतात.