नागपूर : शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमत्तेच्या वादातून हिंसक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दोन चुलत बहिणींमध्ये सुरू असलेल्या वादाने उग्र रूप घेतल्याने एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही बहिणींमध्ये मालमत्तेवरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी चर्चा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याचदरम्यान एका बहिणीने तिच्या बॉयफ्रेंडला घटनास्थळी बोलावले.
सुरुवातीला आरोपी युवकाने फोनवरून शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोन्ही पक्ष पारडी परिसरात चर्चेसाठी एकत्र आले. मात्र, चर्चा सुरू असताना वाद अधिकच चिघळला.याच वेळी आरोपी युवकाने संतापाच्या भरात दुसऱ्या बहिणीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी युवक घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









