नागपूर -भारताच्या उत्तरेकडील सीमारेषेवर, लडाखच्या अतिदुर्गम आणि हिमशीत प्रदेशात घडलेला २१ ऑक्टोबर १९५९ चा दिवस भारतीय पोलीस इतिहासात अमर झाला आहे. हा दिवस म्हणजे त्याग, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक — पोलीस स्मृती दिन.
लेहजवळील हॉटस्प्रिंग परिसर — समुद्रसपाटीपासून तब्बल १६,००० फूट उंचीवर आणि उणे ४५ अंशांपर्यंत खाली जाणाऱ्या तापमानात देशाच्या सीमारेषेवर भारतीय जवान सतत पहारा देत होते. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक श्री. करणसिंग यांच्या नेतृत्वाखालील १० जवानांची तुकडी गस्त घालत असताना, हॉटस्प्रिंगपासून जवळपास ५ मैल अंतरावर त्यांच्यावर चिनी सैन्याने अचानक स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार सुरू केला.
भारतीय जवानांनी “फायर” असा आदेश मिळताच शत्रूंना तितक्याच धैर्याने प्रत्युत्तर दिले. पण चिनी सैन्याची संख्या अधिक आणि शस्त्रसाठा कमी असल्याने, अखेर हे शूरवीर अखंड लढा देत देत वीरमरण पत्करले. त्यांच्या बलिदानामुळे त्या दिवशी चिनी सैन्याला पुढे सरकणे शक्य झाले नाही.
या संघर्षात बलिदान देणारे शूर जवान होते. चरमसिंह, पुरणसिंह, नार्बु लांबा, बेगराजमल, माखनलाल, इमानसिंह, तेशरिंग बोखु नार्बु, हंगजित सुच्या, शिवनाथ प्रताप आणि करणसिंग.
त्यांच्या शौर्याने हॉटस्प्रिंगचे भूमी लाल झाली आणि भारतमातेच्या कुशीत त्यांचा अखेरचा श्वास विलीन झाला.
जेव्हा ही दु:खद बातमी ७ नोव्हेंबर १९५९ रोजी बिहारमधील पटना येथे भरलेल्या अखिल भारतीय पोलीस मेळाव्यात पोहोचली, तेव्हा संपूर्ण देश शोकमग्न झाला. संपूर्ण भारताने दिवाळीचे आनंद सोडून या वीरपुत्रांच्या स्मृतीत दु:ख व्यक्त केले.
१३ नोव्हेंबर १९५९ रोजी चिनी सरकारने १४ दिवसांनंतर या १० जवानांचे मृतदेह भारताला परत केले. दुसऱ्याच दिवशी, १४ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजता हॉटस्प्रिंग येथे सन्मानपूर्वक त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यानंतर भारतभरातील सर्व पोलीस दलाने आपापल्या योगदानातून निधी जमा करून, हॉटस्प्रिंग येथे स्मारक बांधले. त्या स्मारकावर आजही लिहिलेला संदेश प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्ती चेतवतो “When you go home, tell them of us and say, for their tomorrow, we gave up our today.”(“तुम्ही घरी गेल्यावर त्यांना आमच्याबद्दल सांगा — त्यांच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज अर्पण केला आहे.”)
या वीर जवानांच्या स्मृतीला जतन करण्यासाठी २१ ऑक्टोबर हा दिवस “पोलीस स्मृती दिन” म्हणून पाळला जातो.
या दिवशी संपूर्ण भारतात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे सन्मानपूर्वक वाचून दाखवली जातात. परेड मैदानात बंदुकीची उलटी सलामी दिली जाते, दोन मिनिटांचे मौन पाळले जाते आणि त्यांच्या पराक्रमाला मानवंदना अर्पण केली जाते.
यावर्षी भारतभरात १९१ पोलीस अधिकारी आणि अंमलदार कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले आहेत. त्यांना सन्मानपूर्वक श्रद्धांजली देण्यासाठी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवसाचे स्मरण म्हणजे देशसेवेतील अखंड निष्ठेचा संकल्प, शौर्याचा अभिमान आणि शहीद पोलीस बांधवांप्रती कृतज्ञतेची भावना.या सर्व शूरवीरांना मनःपूर्वक वंदन.