Published On : Thu, May 24th, 2018

ताडोब्यात आढळला ब्लॅक पँथर

चंद्रपूर :ताडोब्यात बेल्जियमच्या एका जोडप्याला दुर्मिळ ब्लॅक पँथर दिल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी हे क्षण कॅमेऱ्यात कैद केल्याने वनविभाग सतर्क झाला असून कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवले जात आहे.

राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला महत्वाचे स्थान आहे. हे पानझडीचे वन असून मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये येते. रॉयल बेंगॉल टायगर या वाघाच्या प्रजातीसाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ या प्रकल्पात आहेत. म्हणूनच देश-विदेशातील पर्यटकांची येथे गर्दी होते. बेल्जियमवरून वाघोबाला पाहण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला मंगळवारी ब्लॅक पँथर आढळला. दुपारच्या फेरीत जंगल सफारी करताना कोळसा वनपरिक्षेत्रात शिवाझरी भागात या जोडप्याला सायंकाळी ५.१५ वाजतादरम्यान दिसला. ज्युलिएट डीकॅसटेकर यांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होताच कुतूहल व्यक्त झाले.

याच प्रकारचा बिबट्या २०१४मध्ये कोळसा व मोहर्लीच्या सीमेवरील बोटेझरी भागात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ मध्ये दिसला होता, अशी माहिती ताडोब्याच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. तो आणि आत्ताचा बिबट वेगळा की एकच हे अजून स्पष्ट झालेले नाही. या भागात ब्लॅक पँथरचे दर्शन ही महत्वपूर्ण बाब मानली जात असून ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ वाढविण्यात आले आहे. या माध्यमातून बिबट्याची अधिक माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापन याकडे लक्ष ठेवून आहे.

काय आहे काळा बिबट्या?

ब्लॅक पँथर किंवा काळा बिबट्या हा सर्वसाधारण बिबट्याचाच एक भाग आहे. ती वेगळी प्रजाती नाही. शरीरात एक ‘मॅलेनीन’ रंगद्रव्य असते. ते अधिक झाल्याने शरीराचा रंग काळा होत असतो. या बिबट्याच्या शरीरावर ठिपकेही दिसत आहेत.