
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणूक तयारीस गती दिली आहे. पक्षाने सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षण सुरू केले असून, उमेदवार निश्चित करताना या सर्वेक्षणाचा निकाल निर्णायक ठरणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पुण्यात झालेल्या पदाधिकारी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “भाजपमध्ये अनेक इच्छुक कार्यकर्ते आहेत, परंतु तिकीट त्यांनाच दिले जाईल ज्यांच्याबद्दल जनता समाधानी आहे आणि ज्यांनी खर्या अर्थाने जनतेसाठी काम केले आहे. तिकीट वाटपात जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची प्रतिमा आणि सर्वेक्षणाचा निष्कर्ष या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.”
बावनकुळे पुढे म्हणाले, “भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (आजीत पवार गट) या महायुतीला आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. नुकतीच आम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तसेच शिवसेना नेते उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्यासोबत समन्वय समितीची बैठक घेतली. प्रत्येक मतदारसंघात वास्तव सर्वेक्षण करूनच उमेदवार ठरवले जातील.”
भाजपच्या या निर्णयामुळे पक्षात शिस्तबद्ध आणि जनतेकेंद्री उमेदवार निवड प्रक्रियेचा संदेश दिला गेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही रणनीती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.










