नागपूर : आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. २०१४ प्रमाणे यंदाही सोशल मीडियाच्या मदतीने भाजप लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार करणार आहे. सोशल मीडिया स्वयंसेवकांच्या मदतीने भाजप मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली.
सोशल मीडिया प्रभावकांची मदत भाजपासाठी फायदेशीर ठरणार ?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय प्रमुखांची घोषणा करून भाजपने एक प्रकारे मिशन 2024 ला हिरवा झेंडा दाखवला आहे. 2024 ची निवडणूक सोपी होणार नाही हे भाजप नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे 2014 प्रमाणे यावेळीही तरुण मतदारांवर भर दिला जात आहे. सोशल मीडियावर सक्रियता वाढवण्यासाठी पक्ष प्रभावकांनाही घेऊ शकतो. वेगवेगळ्या पातळ्यांवर चाचण्या सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर जिल्ह्यातील काही निवडक प्रभावशालींशी संवाद साधला आहे. मात्र सोशल मीडिया प्रभावकांच्या माध्यमातून भाजपला पक्षाची ताकद वाढवता येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर 14 ते 30 वयोगटातील तरुणांची संख्या अधिक –
ट्विटर, फेसबूकसह अन्य समाज माध्यमांवर साधारणतः 14 ते 30 वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. भाजपाकडून याच तरुणांना मदतीचे आव्हान करण्यात येणार आहे . मात्र यातून १८ ते ३० वर्ष वयोगटातीलच तरुणांना मतदानाचा अधिकार असून त्याखलील युवकांचा भाजप कशापद्धतीने वापर करून घेणार आणि ते कायदेशीररीत्या योग्य ठरणार का? हे देखील पाहावे लागेल. तसेच भाजपच्या गोटातील कार्यकर्ते आणि नेत्यांची किती खाती आहेत. त्यावर किती जण संदेश टाकतात. रोज संदेश टाकणारे किती आहेत, पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे ट्विट कितीजण रिट्विट करतात याकडेही भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
भाजपचे नेत्यांना सोशल मीडियावर सक्रियता वाढवण्याच्या सूचना
2024 च्या निवडणुकीसाठी फक्त 10 महिने उरले आहेत. त्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. प्रसिद्धीसाठी ब्ल्यू प्रिंटही तयार करण्यात येत आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे पदाधिकारी आणि नेत्यांना सोशल मीडियावर सक्रियता वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर युवक अधिक सक्रिय आहेत, अशा परिस्थितीत नेत्यांच्या सक्रियतेचा फायदा त्यांना मिळू शकतो. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडियावर सक्रियता वाढवण्यासोबतच विविध अॅप्सवर सक्रिय प्रभाव टाकणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रचारात प्रभाव टाकणाऱ्यांचा फायदा कसा घ्यायचा यावर विचारमंथन सुरू आहे. येत्या निवडणुकीमध्ये भाजपचा सोशल मीडिया प्रचार किती फायदेशीर ठरणार ? हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.