Published On : Thu, Jun 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भाजपाची भूमिका स्पष्ट ; राज्यात हिंदी सक्ती नाही, मराठी शिकणं अनिवार्यच

Advertisement

मुंबई – राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरुन सुरू झालेल्या चर्चेला उत्तर देत भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. “हिंदी ऐच्छिक असून मराठीच केवळ बंधनकारक आहे. त्यामुळे हिंदी सक्तीचा आरोप निराधार आहे,” असं मत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडलं.

शेलार म्हणाले, “भाजप मराठी भाषेबाबत कट्टर भूमिका घेत असला, तरी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतो. इतर भाषांबाबत आमची भूमिका संतुलित आहे. राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणात कोणत्याही इतर भाषेची सक्ती नाही.”

ते पुढे म्हणाले, “हिंदीला ऐच्छिक पर्यायी भाषा म्हणून स्थान असावं, अशी आमची भूमिका आहे. त्रिभाषा सूत्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. यातून त्यांना अधिक संधी मिळू शकतात.”

शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना म्हटलं की, “पाचवी ते सातवीच्या वर्गांत हिंदीची सक्ती यापूर्वी अस्तित्वात होती. ती भाजपच्या शासनाने रद्द केली. त्यामुळे आज हिंदी ही पर्यायी भाषा आहे. याआधी त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.”

Advertisement

सीबीएसई, आयसीएसई, कॅम्ब्रिज बोर्डाच्या शाळांमधील मराठी विद्यार्थ्यांवर भाषेच्या असमतोलाचा परिणाम होतो, हे लक्षात घेत २०२० मध्ये मराठी भाषा कायदा लागू करण्यात आला, असंही त्यांनी नमूद केलं. त्या कायद्यामुळे अशा शाळांमध्ये मराठी शिकवली जाते.

“राज्यातील अनेक शाळांमध्ये उर्दू, बंगाली यांसारख्या इतर भाषाही शिकवल्या जातात. त्या ठिकाणी मराठीसह तीन भाषा शिकवण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या सुरू आहे. त्यामुळे त्रिभाषा शिकणं कठीण किंवा अन्यायकारक आहे, हा युक्तिवाद चुकीचा आहे,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

शेवटी शेलार म्हणाले, त्रिभाषा सूत्रावर काही लोक मुद्दाम संभ्रम निर्माण करत आहेत तर काहीजण गैरसमजात आहेत. मात्र भाजपाचा विश्वास आहे की विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे धोरण आवश्यक आहे आणि या मुद्द्यावर पक्ष ठाम आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.