
अमरावती : अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलन संपल्यानंतर त्यांनी स्पष्ट आरोप केला की, सोशल मीडियावर सुरू असलेली ट्रोलिंग मोहिम भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी रचलेली योजना आहे.
कडू म्हणाले, “आमच्याविरोधात जाणूनबुजून अपप्रचार केला जात आहे. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या कटकारस्थानाची किंमत भाजपाला चुकवावी लागेल. एक दिवस जनता स्वतःच या फसव्या प्रचाराविरोधात उभी राहील.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही या ट्रोलिंग प्रकरणावर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यासाठी पाच वकिलांची विशेष टीम तयार केली आहे. सोशल मीडियावरील द्वेषमूलक आणि बदनाम करणाऱ्या पोस्ट्सविरुद्ध ही टीम तातडीने पावले उचलेल.
भावूक होत कडू म्हणाले,जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम केल्यावरही जेव्हा खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, तेव्हा मनाला वेदना होतात. पण आता जे कोणी आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना ठोस उत्तर मिळेल.
त्यांनी सांगितले की, विविध जिल्ह्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या असून लवकरच ट्रोलिंगमध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार आहे.








