Published On : Thu, May 11th, 2017

भाजप प्रदेशाध्यक्ष खा. दानवेंच्या विधानाबाबत भूमिका स्पष्ट करा!

392025-vikhe-patil
मुंबई:
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेला शिवराळ भाषेचा वापर म्हणजे अक्षम्य अनास्था व कोडगेपणाचे प्रतिक असून, या विधानाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

खा. दानवे पाटील यांनी जालना येथे जाहीर सभेत शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्याच्या प्रकाराचा विखे पाटील यांनी तीव्र निषेध केला. शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान अवमान तरी करू नये. मागील काही काळापासून बळीराजाचे खच्चीकरण सुरूच होते. शिवीगाळ करण्याची कसर तेवढी शिल्लक होती. ती देखील भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी भरून काढली, या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी या विधानाचा समाचार घेतला.

एकिकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगून नवनवीन घोषणा करीत आहेत. राज्यातील शेतकरी सुजलाम-सुफलाम करण्याचा आव आणला जात आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांच्या भावनांना ठेच लावणारी विधाने करीत आहे. या दुतोंडी भूमिकेतून शेतकऱ्यांप्रतीची अनास्था दिसून येते. शेतकऱ्यांचा घोर अवमान करणाऱ्या या विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका जाहीर केली पाहिजे. मुख्यमंत्री मौन बाळगून राहिले तर या विधानाशी ते सुद्धा सहमत असल्याचे स्पष्ट होईल, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement