Published On : Mon, Oct 29th, 2018

भाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार- नवाब मलिक

Advertisement

मुंबई : भाजप सरकार चार वर्षाची विकास यात्रा काढत आहे परंतु आम्ही भाजप सरकार चार वर्षात कसे अपयशी ठरले आहे हे सांगणार आहोतच शिवाय १ नोव्हेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात जावून घोंगडी बैठका घेवून सरकारच्या अपयशाच्या गाथा पुस्तकाच्या रुपात जनतेपर्यंत पोचवणार असल्याची माहिती देतानाच चार वर्षात भाजप-शिवसेनेचे सरकारने जनतेला कशापध्दतीने फसवले आहे याचा पाढाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये वाचला.

३१ ऑक्टोबरला भाजप-सेनेच्या सरकारला चार वर्ष पूर्ण होत असून त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज पत्रकार परिषद घेवून ‘ही कसली प्रगती ही तर अधोगती’… ‘असुरक्षित,अर्थशून्य,अशांत,असहाय्य महाराष्ट्र’ नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेमध्ये अपयशी सरकारची चार वर्ष यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. सरकारने जनतेला कसे फसवले आहे.राज्यात कशा पध्दतीने फसव्या योजना आणि योजनांचे कसे फसवे बुडबुडे काढले आहेत ते मांडले. छत्रपती शिवाजी महाराज का आर्शिवाद,चलो चले मोदी के साथ असा नारा देत भाजप सत्तेत आले.सत्तेत येताना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासन दिले. विरोधी पक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी हा उपाय नाही असे सांगत होते. मात्र कर्जमाफी जाहीर करताना त्यांनी आकडयाचा खेळ केला. आघाडी सरकारच्या काळात ८ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु या चार वर्षात १० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली. परंतु आजपर्यंत १६ हजार कोटींचे कर्जवाटप झाले आहे. जर ३४ हजार कोटीची कर्जमाफी तर इतर पैसे गेले कुठे असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

राज्यातील अजुनही ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.सरकारने कर्जमाफीचे आकडे मोठे दाखवले.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणणाऱ्या सरकारने फसवी कर्जमाफी करुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढवला आहे. सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर झाला तरी हमीभावाप्रमाणे आजही सौदे होत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. हमीभावाबाबत ठोस असे सरकार शेतकऱ्यांना सांगायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दयायचा असेल तर सरकारने स्वत:चे खरेदी केंद्र उभारावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

राज्यात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना ही जलयुक्त झाली की जलमुक्त झाली आहे. ही योजना भाजप कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी सुरु करण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

कर्जमाफी…हमीभाव…सिंचन आदींसह सर्वच क्षेत्रात राज्यातील जनतेला दिलासा देण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून ७० हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे आणि २ लाख तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्याचे सांगत आहेत त्यांनी २ हजार तरी नोकऱ्या दिलेल्यांची नावे जाहीर करावीत असे आव्हान नवाब मलिक यांनी यावेळी दिले.

राज्यातील अस्तित्वात असलेले कारखाने बंद होत आहेत. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत.भाजपच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरु आहे.राज्याचे कामगारमंत्री निलंगेकरांच्या माध्यमातून कारखानदारांकडून खंडणी घेण्याचे काम सुरु आहे.माथाडी कामगार निर्माण करुन राज्यात गुंडगिरी सुरु असून त्यामुळे राज्यात कारखाने आणि उदयोगधंदे यायला तयार नसल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

मुंबईतील मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना एका आमदारावर जीवघेणा हल्ला झाला होता तशी तक्रार आमदाराने केली आहे.बिहारपेक्षाही वाईट स्थिती राज्यात सुरु आहे. गुंडाकडून खंडणी घेण्यासाठी आमदार पुढे येत आहेत.राज्यात कारखानदारी नाही तर गुंडगिरी वाढली आहे. तर मॅग्नेटिक महाराष्ट्रामुळे रोजगार नाही तर बेरोजगारी वाढल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

स्कील इंडियाच्या गप्पा मारुन फसवी योजना निर्माण करण्यात आली आहे.शिर्डीत पंतप्रधानांनी घरकुल योजनांची घोषणा केली. या कार्यक्रमासाठी कितीतरी कोटी खर्च आला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मुंबईमधील ९० हजार झोपडया तोडण्यात आल्या आहेत. सरसकट अपात्र करण्यात येत आहे.१६०० लोकांपैकी ९ लोकांना पात्र ठरवण्यात आले आहे. यांच्याकडे त्यांच्या पुनर्वसनासाठी जागाच शिल्लक नाही. २०२२ पर्यंत घरे देतो सांगून ९० हजार झोपडयांना मुंबईतून उध्वस्त केले जात आहे. त्यामध्ये ५ हजार झोपडया पात्र ठरवण्यात आल्या आहेत तर ८५ हजार झोपडयांना बेघर करण्यात आले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

आघाडी सरकारच्या काळात स्वस्त धान्य दिले जात होते त्या लाभार्थ्यांची यादीच सरकारने रद्द केली आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढले तरी रास्त धान्य दुकानावर रॉकेल दिले जात नाही. रास्त धान्य दुकानावर बायोमॅट्रीक पध्दत सरकारने आणली परंतु ग्रामीण लोकांना हे शक्य होत नसल्याने त्यांना धान्य मिळणं कठीण झाले आहे त्याचा गैरफायदा धान्यदुकानदार घेत ब्लॅकने धान्य विकत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

राज्यातला क्राईम रेट भयानक आहे. जीवघेणे हल्ले, हत्या, बलात्कार वाढले आहेत. महाराष्ट्रात ३६ हजार महिला मुंबईमध्ये बेपत्ता आहेत त्यांचा शोध लागत नाही.ही कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

बजेटमध्ये मोदींना आयुष्मान भारतची घोषणा केली होती.आणि त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु होतेय अशी घोषणा या मुख्यमंत्र्यांनी केली होती. आपल्याकडे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु असताना साडेसात कोटी लोकांना त्याचा लाभ मिळत होता.राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलतो.महात्मा फुले जीवनदायी योजनेचे नाव बदलतो असे सांगितले.याचे जवळपास साडेसात कोटी लाभार्थी होते.आता आयुष्मान भारत योजनेमध्ये ८ लाख शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना लाभ मिळतो. म्हणजे कुठेतरी ४० लाख लोकांना लाभ मिळणार आहे. जवळपास ६० कोटी लोकांना यातून बाहेर काढले जाणार आहे.१ एप्रिलपासून राजीव गांधी जीवनदायी योजना बंद झाल्यानंतर राज्यातले ७ कोटी लोकांना लाभ मिळणार नाही.

म्हणजे आज गरीब कुठेतरी उपचार घेत होते. परंतु पंतप्रधानांचे ड्रीम प्रोजेक्ट या राज्यात आणत आहेत आणि साडेसात कोटी लाभार्थ्यांपेक्षा नुसते ४० लाख लाभार्थी झाले आहेत. ते सांगत आहेत ४८ लाख लोक रेशनकार्डवर आहेत तरी २ कोटी ४० लाख लाभार्थी राहतील. परंतु यातून ५ कोटी लाभार्थी याच्यातून बाद होणार आहेत. म्हणजे मोदीसाहेब लोकांचा जीव घेण्याच्या योजना आणत आहेत की,आयुष्मान भारत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दयावे. म्हणजे साडेसात कोटी लोकांना मोफत उपचाराचा आकडा ४० लाखावर ठेवला आहे. २ कोटी आणखी वाढतील असे सांगत आहेत तरी ५ कोटी लोकांचे काय याचं उत्तर दयावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली

स्वास्थ विमा योजना बंद करुन मुख्यमंत्र्यांचे नाव आहे त्यावर पंतप्रधानांचे करायचे आणि ५ कोटी लोकांना बाद करायचे हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

एकंदरीत आज घडीला महाराष्ट्र असुरक्षित आणि अशांत, असहाय्य झालेला आहे.आम्ही सत्तेत होतो त्यावेळी हे सरकार बोंबाबोंब करत होते की अडीच लाख कोटीचे कर्ज केले आहे परंतु चार वर्षात पाच लाख कोटीचा कर्जाचा डोंगर कसा झाला आहे.राज्यसरकार दिवाळखोरीत गेले तरी चालेल परंतु आपली हप्तेखोरी कशी वाढेल हा धंदा सुरु केला असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

मुंबईतील धारावी परदेशी कंपनीला विकत देण्याचा डाव भाजपाचा आहे. दुबईच्या एका व्यापाऱ्याच्या हातात ६०० एकर जमीन देण्याचा कार्यक्रम सरकारचा सुरु असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

विकासाच्या नावावर कर्जाचा डोंगर…ब्लॅकलिस्टमधील ठेकेदाराला ठेका देत ४ वर्षात महाराष्ट्राला लुटले आहे…बेकार केले आहे…या चार वर्षात सरकारला विकास करता आलेला नाही. आत्ता विकास यात्रेच्या नावावर भाजप पैसे देवून प्रचार करेल परंतु आम्ही कार्यकर्त्यांना घेवून सरकारचे अपयश जनतेसमोर आणणार असून त्याविरोधात राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण उपस्थित होते.