नवी दिल्ली – इंग्रजी ही अडथळा नाही, ती एक संधी आहे. ती गुलामीचं प्रतीक नाही, तर साखळदंड तोडण्याचं हत्यार आहे,” अशा ठाम शब्दांत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर खरमरीत टीका केली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टपणे म्हटलं, BJP आणि RSS ला वाटतं की गरीबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये. कारण एकदा का त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली, की त्यांच्या पुढे प्रगतीचे दरवाजे उघडतील – हेच त्यांना नको आहे.
आपल्या वक्तव्यात राहुल गांधी म्हणाले, आजच्या जगात इंग्रजी ही एक पूल आहे – जी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी भरून काढू शकते. ही भाषा आत्मविश्वास देते, संधी निर्माण करते आणि मुलांना जागतिक स्तरावर उभं राहण्याची ताकद देते. ती लाज वाटण्यासारखी नाही, तर अभिमान बाळगण्यासारखी आहे.
राहुल गांधी यांनी भारतीय भाषांचं महत्त्वही मान्य करत सांगितलं की, “प्रत्येक भारतीय भाषेमध्ये आत्मा, संस्कृती आणि प्रचंड ज्ञान दडलं आहे. आपण त्या जपायलाच हव्यात. पण त्याचबरोबर गरिबांनाही इंग्रजी शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. ती संधी फक्त उच्चवर्गापुरती मर्यादित राहता कामा नये.”
या विधानामुळे देशातील शिक्षण आणि भाषेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचा दावा आहे की, केंद्र सरकारचं धोरण हे गरीब, मागास आणि वंचित समाजाच्या विरोधात आहे. शिक्षण आणि भाषा या दोन शक्तिशाली साधनांचा वापर समाजात समानता निर्माण करण्यासाठी व्हायला हवा, असं राहुल गांधींचं ठाम मत आहे.
त्यांच्या या विधानाकडे राजकीय विश्लेषक अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. भाषेच्या माध्यमातून सामाजिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप करत राहुल गांधींनी आता थेट इंग्रजी शिक्षणावरून भाजप आणि आरएसएसला लक्ष केलं आहे.