Published On : Wed, Jul 4th, 2018

भूखंड घोटाळा ; आरोप मागे घेण्यासाठी लाड यांचे चव्हाण-निरुपम यांना कायदेशीर नोटीस

मुंबई : नवी मुंबईतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी प्रसाद लाड यांच्यावर संजय निरुपम आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केले होते, त्याप्रकरणी लाड यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप मागे घ्यावे असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे १६०० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ती केवळ ३ कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यातील बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे खास दोस्त आहेत. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी आहेत. त्यामुळे लाड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या आरोपांवर स्पष्टीकरण देतांना लाड म्हणाले, काँग्रेसने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, त्यामुळे मी काँग्रेस विरोधात ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करतो आहे . मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही. माझी अनेक नेत्यांशी आणि बिल्डर्ससोबत मैत्री आहे असेही लाड यांनी म्हटले .