
नागपूर – बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर विमानाचा स्फोट झाल्याचे सांगितले जाते. या अपघाताबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाजपवर तीव्र टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर संशय व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. “भाजप म्हटलं की संशयानेच पाहावं लागतं. त्यांनी खांद्यावर हात ठेवला तरी लोक घाबरतात. भाजप म्हणजे विषारी साप आहे. भाजपसोबत ना दोस्ती, ना दुश्मनी. आम्ही दुश्मनी केली आहे. ते कधीही नाग पाठवू शकतात,” असे वक्तव्य कडू यांनी केले.
प्रशासनातील निर्णयप्रक्रियेवर भाष्य करताना त्यांनी औषध खरेदीतील केंद्रीकरणावर टीका केली. “पूर्वी सिव्हिल सर्जनला औषध खरेदीचे अधिकार होते. आता सर्व अधिकार मंत्रालयात केंद्रीत झाले. त्यामुळे कमिशनखोरी वाढली आणि औषधे महागली,” असा आरोप त्यांनी केला. टेंडर प्रक्रियेतही गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
एमआरईजीएस, लाडकी बहीण योजना आणि अपंगांच्या मानधनाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “एमआरईजीएसचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. लाडकी बहिणीचे मानधन वेळेवर दिले जात नाही. अपंगांचे मानधनही रखडले आहे,” असे ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी सरकारवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. “लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये टाकून मतं मिळवली असतील; मात्र स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांकडून किती पैसे वसूल केले, याचा हिशेब करायला हवा. एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने घेतले,” अशी टीका त्यांनी केली.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी इशारा दिला. “कर्जमाफी मिळाली नाही तर महाराष्ट्रात रेल्वेचे चाक फिरू देणार नाही. आम्ही गनिमी कावा करू,” असे ते म्हणाले. कामगारांच्या प्रश्नावर बोलताना न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “कामगाराला कामावरून कमी केल्यास न्यायालयात जा असे सांगितले जाते; पण निकाल लागायला वर्षानुवर्षे जातात. न्याय मिळेल की नाही, याचीही भीती वाटते,” असे बच्चू कडू यांनी नमूद केले.








