Published On : Sat, Jun 27th, 2020

370 कलम हटविण्याचे धाडस भाजपा शासनाने दाखविले : नितीन गडकरी

भाजपा राजस्थान जनसंवाद रॅलीला ई मार्गदर्शन

नागपूर: जम्मू काश्मीरबाबतचे 370 वे कलम संविधानात तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी सांगितले होते. पण काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या नीतीमुळे काँग्रेसने हे कलम हटविले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा शासनाने मात्र 370 कलम हटविण्याचे धाडस दाखविले असून हे कलम हटवून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे काम भाजपा शासनाने केले, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Advertisement

राजस्थान भाजपाच्या जनसंवाद रॅलीला येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांनी आज संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. राजस्थानमध्ये या ई मार्गदर्शन रॅलीत डॉ. सतीश पुनियानी, गजेंद्रसिंग शेखावत, अर्जुनराम मेघावत, राजेंद्र राठोड, कैलास चौधरी, वसुंधरा राजे, अरुण चतुर्वेदी, सी. पी. जोशी, गुलाबचंद कटारिया आदी उपस्थित होते.

कोविड 19 च्या जागतिक संकटातून आपण जात असून कोविडचे मोठे आव्हान आज देशासमोर आहे. अशा स्थितीतही पूर्ण ताकदीनिशी लढून आपण त्याविरुध्द विजय मिळवू असे सांगून ना. गडकरी म्हणाले- आमच्यावर आलेले हे संकट पहिलेच नाही. यापूर्वीही आमच्या देशावर आणि पक्षावरही अनेक संकटे आलीत. पण ती आपल्या कार्यकर्त्यांनी सामर्थ्याने परतवून लावली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे.

आस्मानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारच्या संकटांचा सामना आम्ही केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणाप्रताप हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने 5 वर्षे पूर्ण केले. हे 6 वे वर्ष आहे. गेल्या 6 वर्षात या देशाचा जेवढा विकास झाला तेवढा काँग्रेसने 55 वर्षे राज्य केल्यानंतरही होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. जम्मू काश्मीरचा मुद्दा काँग्रेसच्या तुष्टीकरण आणि मतपेटीच्या राजकारणामुळे एवढी वर्षे सुटू शकला नाही, असे सांगताना ते म्हणाले- पंतप्रधान मोदी, आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 370 कलम हटविल्यानंतर आज काश्मीरमध्ये चौफेर विकास होत आहे. अभियांत्रिकी कॉलेज, मेडिकल कॉलेज, आयआयटी, एम्स, विविध उद्योग, रस्त्यांचे जाळे अशी विकास कामे सुरु आहेत. 7 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरु आहेत. शांतता आणि अहिंसा स्थापन झाली आहे. गरिबी, भूकमरीपासून जम्मू काश्मीर मुक्त झाले आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानला आपण तीनदा युध्दात पराभूत केल्यानंतर पाकने अंतर्गत सुरक्षा कमजोर करण्यासाठी दहशतवादी कारवाया देशात सुरु केल्या. बॉम्बस्फोट केले. निरपराधांचा जीव गेला. पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. दहशतवाद्यांच्या आणि नक्षल्यांच्या मुसक्या आवळल्या आणि दहशतवादाचा बीमोड केला. आज देशातून दहशतवाद समाप्त होऊन अंतर्गत सुरक्षा प्रस्थापित झाली आहे.

देशात पायाभूत सुविधांची कामे जोरात सुरु आहेत. देशाचे विकासाचे चित्रच बदलले आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- राष्ट्रवाद हा आमचा आत्मा आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनेतून गाव, गरीब, शेतकरी, मजूर यांना जोपर्यंत अन्न, वस्त्र निवारा मिळत नाही, तोपर्यंत आमची दरिद्रीनारायणाची सेवा पूर्ण होत नाही. याच धर्तीवर आमचे काम सुरु आहे. आणि उद्योगांपासून सर्व क्षेत्राचा विकास करून अर्थव्यवस्थेला अशा संकटाच्या काळातही चालना देऊन देशातील प्रत्येक क्षेत्र स्वयंपूर्ण व स्वावलंबी करणे हेच आमचे उद्दिष्ट असून हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement