Published On : Mon, Aug 31st, 2020

अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकर्‍याचे झालेले नुकसान पिकांचे त्वरित सर्वेक्षण करा, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्या : भाजपाची मागणी

Advertisement

बावनकुळेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटले

नागपूर: गेल्या 27 व 28 ऑगस्ट रोजी नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून या अतिवृष्टीचा शेतकर्‍यांच्या पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. तसेच हजारो लोकांच्या घरात पाणी घुसून ते बेघर झाले. या मुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले तर महापुरामुळे नागरिकांना बेघर व्हावे लागले. शेतकर्‍यांच्या पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई व बेघर झालेल्या नागरिकांना खावटीची मदत शासनाने करावी अशी मागणी भाजपा जिल्ह्यातर्फे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

आज बावनकुळे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटून त्यांना एक निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, महिला अध्यक्ष संध्या गोतमारे, किशोर रेवतकर, आ. टेकचंद सावरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कन्हान, पेंच, कोलार, जाम, वर्धा या सर्व नद्यांना महापूर आला होता. पुलावरून पाणी वाहत होते. अनेक गावांना पुराने वेढले होते. लोकांच्या घरात पाणी घुसले, घरांची पडझड झाली. नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

सततच्या पावसामुळे कापूस, धान, सोयाबीन, ही उभी पिके सडण्याच्या मार्गावर आहे. धरणे तुडुंब भरल्यामुळे धरणांचे दरवाजे उघडावे लागले. महापुराची स्थिती निर्माण झाली, याकडे भाजपा शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

मोझॅक रोगामुळे सोयाबीन हातची गेली. तशाच कापूस, धानाचे पीकही जाण्याच्या मार्गावर आहे. पावसामुळे सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नदीकाठची सुमारे 2 किमीपर्यंतची पिके वाहून गेली. अशा वेळी शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण त्वरित करणे आवश्यक आहे. वाहून गेलेल्या व पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी या शिष्टमंडळाने शासनाकडे केली.

या महापुरामुळे अनेक कुटुंबे विस्थापित झाली. त्यांच्या खाण्यापिण्याचे साहित्यही वाहून गेले. अशा विस्थापितांचेही सर्वेक्षण करून त्यांना तातडीने प्रतिकुटुंब 25 हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणीही जिल्हा भाजपाने केली आहे. ज्यांची घरे पडली व वाहून गेली त्यांच्या घरांचे सर्वेक्षण करून त्यांनाही 25 हजार रुपये प्रत्येकी आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही बावनकुळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज केली.