Published On : Thu, Aug 9th, 2018

शहीद राणेंना आदरांजलीऐवजी भाजप नगरसेवकाचं बर्थडे सेलिब्रेशन

Advertisement

मीरा रोड : काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मीरा रोडमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली. मात्र त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच भाजपचे नगरसेवक आणि माजी प्रभाग समिती सभापती यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. विशेष म्हणजे शहराच्या महापौर डिंपल मेहता, स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह भाजप नगरसेवक, पदाधिकारी या जल्लोषात सहभागी झाले. केक खात आणि भरवत त्यांनी भाषणंही ठोकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोमवारी रात्री काश्मिरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना देशाचे चार जवान शहीद झाले. यामध्ये मीरारोडच्या शीतलमधील हिरल सागर इमारतीत राहणारे 29 वर्षीय मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही सहभाग होता. मंगळवारी सकाळीच या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. दुपारपासून सोशल मीडिया आणि बातम्यांमधून मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं दाखवलं गेलं. त्यानंतर त्यांच्या मीरारोड येथील घरी दुपारपासूनच नातेवाईक आणि आप्त जमू लागले. महत्त्वाचं म्हणजे स्वत: आमदार नरेंद्र मेहतांनीही कुटुंबीयांची भेट घेऊन आले.

केवळ मीरा रोडच नव्हे तर राज्य आणि देशात या चार जवानांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात असताना भाजप नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मात्र मंगळवार 7 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस जाहीरपणे धूमधडाक्यात साजरा केला. शहीद राणे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांगीड इस्टेट जवळील सेंट पॉल शाळेसमोर आलिशान मंडप टाकून भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.

महापौर डिंपल मेहता यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच भाजपचे प्रशांत दळवी, दीपिका अरोरा, हेमा बेलानी, दौलत गजरे, हेतल परमार, अनिता मुखर्जी, विविता नाईक, वंदना भावसार या नगरसेवकांसह निलेश सोनी, काजल सक्सेना , सोनिया नायक, किरण चेऊलकर, सुरेश दुबे असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मांजरेकर यांनी केक कापला.

दरम्यान, मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहचलं नव्हतं, असा दावा भाजप नगरसेवर आनंद मांजरेकर यांनी केला आहे. ही माहिती मिळाली असती, तर आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केलं असतं, असंही ते म्हणाले.