
नागपूर – विकासाच्या नावाखाली मोठमोठी झाडे हलवून त्यांचे ट्रान्सप्लांटेशन करण्यात आल्याचा दावा सरकार सातत्याने करते. मात्र हे झाडे प्रत्यक्षात जिवंत आहेत का, हा प्रश्न आज अधिक गंभीर स्वरूपात पुढे आला आहे. ‘नागपूर टुडे’ने या विषयावर प्रकाश टाकत सक्करदरा परिसरात गेल्या काही महिन्यांत ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांची पाहणी केली असता बहुतेक झाडे कोमेजलेली, सुकलेली आणि पूर्णपणे मृतावस्थेत आढळली.
कागदोपत्री ही झाडे अद्यापही जिवंत दाखवली जात असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत. झाडांचे ट्रान्सप्लांटेशन झाले, पण त्यानंतरची काळजी, सिंचन, देखभाल, तसेच नियमित निरीक्षण या महत्त्वाच्या टप्प्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर येत आहे. झाडांना वाचवण्याच्या नावाखाली फक्त औपचारिकता पूर्ण करून फाईल्सला हिरवा रंग देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दशकभर वाढलेली झाडे काही मिनिटांत तोडली जातात, आणि जी झाडे वाचवण्याचा दावा केला जातो तीही काही महिन्यांत मरतात. विकासाचे काम आवश्यक असले तरी त्यासाठी पर्यावरणाचा बळी देणे आणि ट्रान्सप्लांटेशनच्या नावाखाली मृत झाडांना जिवंत दाखवण्याचा खेळ हा चिंताजनक आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या या वास्तवामुळे “हरित विकास” या कल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.









