
पुणे– राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यामुळे काल संध्याकाळी त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे तातडीने दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
बारामतीत असताना सकाळी व दुपारी डॉक्टरांच्या पथकाने गोविंदबाग येथे जाऊन शरद पवार यांची तपासणी केली होती. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुण्यात हलवण्यात आलं. यावेळी त्यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर सायमन ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आवश्यक उपचार करण्यात आले असून त्यांना होत असलेला त्रास सध्या कमी झाला आहे. मात्र, खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत.
रुग्णालय प्रशासनाने हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार उपचार सुरू असल्याचं सांगत, कार्यकर्ते व हितचिंतकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून विचारपूस-
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांनी स्वतः फोन करून पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याचं समजतं.
सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण-
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांच्यावर पाच दिवसांचा अँटीबायोटिक्स कोर्स सुरू आहे. सुदैवाने इतर सर्व तपासण्या सामान्य आल्या आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आज संध्याकाळी किंवा उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे.








