
नागपूर – शहरात तब्बल ३४ कोटी २७ लाख रुपयांच्या शेअर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीतील शेअर्स हडप केल्याप्रकरणी चुलत दिरासह आठ जणांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार सोनल मनोज अग्रवाल (वय ४५, रा. जलाराम अपार्टमेंट, लकडगंज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींमध्ये रवी रतनकुमार अग्रवाल, प्रिती रवी अग्रवाल, शकुंतलादेवी रतनकुमार अग्रवाल, गोपाल अग्रवाल, मुस्कान अग्रवाल, अशोक ऋषीकेश अग्रवाल, सुभाषचंद्र मंगतराम अग्रवाल आणि गेंदलाल पंचमलाल अग्रवाल (सर्व रा. रायपूर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या सासऱ्यांनी, म्हणजे सज्जनकुमार अग्रवाल यांनी आपल्या धाकट्या भावासह रतनकुमार अग्रवाल यांच्या भागीदारीत “मेसर्स ओरीसा बंगाल कॅरिअर लिमिटेड” ही ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू केली होती. व्यापार वाढीसाठी या कंपनीचे नागपूरात प्रादेशिक कार्यालय उघडण्यात आले होते.
कंपनीचे कामकाज मनोज अग्रवाल हे पाहत होते. २०१८ साली कंपनीची मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी झाली होती. या वेळी कंपनीला सुमारे ५२ लाख २१ हजार शेअर्सचा हक्क प्राप्त झाला होता, ज्यात मनोज अग्रवाल, त्यांची पत्नी, आई आणि इतर नातेवाईकांचे नाव होते.
मात्र, मनोज यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे काका रतनकुमार आणि त्यांच्या मुलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शेअर्स आपल्या नावावर करून कंपनीवरील नियंत्रण मिळवले, असा आरोप आहे.
तसेच, २०२४ मध्ये मनोज यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली असता आरोपींनी पैसे देण्यास नकार देत टाळाटाळ केली. त्यानंतर सोनल यांनी चौकशी केली असता ३१ कोटी २७ लाख ४१ हजार रुपयांचे शेअर्स आणि बँक खात्यातील आणखी ३ कोटी रुपयांची रक्कम वळविण्यात आल्याचे समोर आले.
या गंभीर प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून संपूर्ण व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.










