नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे-पाटील यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
गुडधे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानात धांदली झाल्याचा आरोप करत फडणवीस यांची निवड रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांच्या आरोपांना कोणतेही तथ्य नसल्याचे नमूद करत ही याचिका तांत्रिक कारणावरून फेटाळली.
2024 मध्ये दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. फडणवीस यांनी सुमारे 40 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. पराभवानंतरही गुडधे यांनी निवडणुकीत अपारदर्शकता असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती.
गुडधे यांनी याचिकेत लिहितं दिलं की, निवडणुकीत फडणवीस व इतर काही उमेदवारांनी नियमांचे उल्लंघन केले असून, त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी. दुसरीकडे, फडणवीस यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुनील मनोहर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, निवडणूक याचिका दाखल करताना उमेदवाराची वैयक्तिक उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, गुडधे यांनी याचिका सादर करताना त्या नियमांचे पालन केले नव्हते.
दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. अखेर शुक्रवारी खंडपीठाने निर्णय देताना गुडधे यांची याचिका फेटाळून लावली आणि फडणवीस यांच्या बाजूने निर्णय दिला.
या निर्णयामुळे फडणवीस यांचा आमदारपद आणि परिणामी मुख्यमंत्रीपद अबाधित राहिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.