नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून IPL 2025 हंगाम तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली असली, तरीही सध्याची परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल अत्यावश्यक ठरल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
गुरुवारी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा आयपीएल 2025 मधील 58वा सामना मध्यंतरातच रद्द करण्यात आला होता. सामन्यात पंजाबची फलंदाजी सुरू असताना, म्हणजे 10.1 षटकांत एक गडी बाद 122 धावा झालेल्या अवस्थेत, अचानक एक फ्लडलाइट बंद करण्यात आली. त्यानंतर उर्वरित दिवेही बंद करून प्रेक्षकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाहेर काढण्यात आले.
ही कारवाई पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर तात्काळ राबवण्यात आली. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमध्ये संभाव्य धोका लक्षात घेता ब्लॅकआउट जाहीर करण्यात आले होते. हे सर्व शहरं धर्मशाळा परिसरात येतात. भारतानेही या हल्ल्याला त्वरित प्रत्युत्तर दिलं असून, पाकिस्तानच्या सहा क्षेपणास्त्रांचा पाडाव करण्यात आला असून अनेक ड्रोन देखील निष्क्रिय करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आगामी सामन्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने, IPL 2025 पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सांगितले की, परिस्थिती निवळल्यानंतर आणि सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यावरच स्पर्धेच्या पुढील टप्प्यांचा विचार केला जाईल.
दरम्यान क्रिकेट प्रेमींसाठी हा मोठा धक्का असला तरी राष्ट्रहित आणि सुरक्षा या प्राथमिकतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट होते.