
नागपूर : ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या काळात दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे.
वाहतूक परिमंडळ सक्करदरा अंतर्गत येणारे काही प्रमुख मार्ग आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये आवारी चौक ते किडा चौक, तसेच किडा चौक ते आवारी चौक हा मार्ग दोन्ही बाजूंनी बंद राहणार आहे. संबंधित मार्गांवरील वाहतूक अप्सरा चौक, अशोक चौक, मेडीकल चौक, बैद्यनाथ चौक, तसेच उंटखाना चौक मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच बुधवारी बाजारातून किडा चौकाकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद राहील.
या काळात नियमित वाहतूक वैद्यनाथ चौक, अशोक चौक, अप्सरा चौक, केशवद्वार, संत गजानन चौक, तिरंगा चौक आणि गुरुदेव नगर चौक मार्गे उमरेड रोडकडे वळविण्यात येणार आहे.
सदर वाहतूक व्यवस्था ७ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत अंमलात राहील. दररोज संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हे नियमन लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक उपआयुक्त लोहित मतानी यांनी दिली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या कालावधीत वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे आणि आपल्या प्रवासाची पूर्वतयारी करावी, जेणेकरून कोणतीही गैरसोय होऊ नये.









