नागपूर – सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे इन्स्टाग्राम आपल्या मेसेजिंग सेवेत महत्त्वाचा बदल करणार आहे. कंपनीने डायरेक्ट मेसेज (DM) संबंधित एक सुरक्षा फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे अनेक युजर्समध्ये चर्चा सुरू झाली आहे.
८ मे २०२६ पासून फीचर बंद-
मेटा कंपनीच्या मालकीचे इन्स्टाग्राम ८ मे २०२६ पासून डायरेक्ट मेसेजमधील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ही सुविधा बंद करणार आहे. कंपनीने ही माहिती आपल्या अधिकृत सपोर्ट पेजवर दिली आहे. या बदलानंतर इन्स्टाग्रामवर एन्क्रिप्टेड चॅट्सची सुविधा उपलब्ध राहणार नाही.
याआधी काही निवडक वापरकर्त्यांसाठी सुरक्षित मेसेजिंगचा पर्याय म्हणून हे फीचर उपलब्ध करण्यात आले होते. मात्र या सुविधेचा वापर खूपच कमी होत असल्याने ते बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सुरक्षित संवादासाठी इतर अॅप्सचा वापर-
अधिक सुरक्षित संवादासाठी वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅप किंवा सिग्नलसारख्या अॅप्सचा वापर करावा, असा सल्ला कंपनीने दिला आहे. या अॅप्समध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आधीपासूनच उपलब्ध आहे.
एन्क्रिप्शन म्हणजे काय?
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ही अशी प्रणाली आहे ज्यामध्ये पाठवलेले संदेश फक्त पाठवणारा आणि प्राप्त करणारा व्यक्तीच वाचू शकतो. मेसेज पाठवताना तो कोडमध्ये बदलला जातो आणि प्राप्तकर्त्याच्या डिव्हाइसवरच तो पुन्हा उघडला जातो. त्यामुळे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीलाही त्या संदेशांमध्ये प्रवेश मिळत नाही.
युजर्सना बॅकअप घेण्याची सूचना-
या बदलामुळे ज्यांनी एन्क्रिप्टेड चॅट्स वापरले आहेत अशा युजर्सना त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सूचना दिल्या जाणार आहेत. कंपनीकडून मेसेजेस, फोटो आणि इतर मीडिया फाइल्स डाउनलोड करण्यासाठी नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. तसेच डेटा सेव्ह करण्यासाठी अॅपचे नवीन व्हर्जन अपडेट करणे आवश्यक असेल.









