Published On : Tue, Jan 8th, 2019

‘अमृत योजना’ कामाचे लवकरच भूमिपूजन

Advertisement

जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांची माहिती : संभाव्य पाणीटंचाईचा घेतला आढावा

नागपूर : नागपूर शहरात अमृत योजनेचे कार्य चार टप्प्यात होणार आहे. यासंदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच भूमिपूजन होणार असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली.

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमधील पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेता आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी, पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी (ता. ८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात जलप्रदाय समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांच्यासह उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्य हरिश ग्वालबंशी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, जनरल मॅनेजर (ई ॲण्ड एम) दीपक चिटणीस, ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, निदेशक के.एम.पी. सिंह, उपनिदेशक राजेश कालरा, राहुल कुलकर्णी, वेबकॉसचे प्रकल्प व्यवस्थापक दीपांक अग्रवाल उपस्थित होते.

यावेळी सभापतींनी पाणी पुरवठ्याची सदस्यस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनेच्या दृष्टीने झोननिहाय आढावा घेतला. अमृत योजनेची सद्यस्थिती, दूषित पाण्याचे नियोजन, उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती, २४ बाय ७ ची सद्यस्थिती व विस्तारीकरण, बोरवेलची दुरुस्ती व उंची वाढविण्याबाबतचे धोरण, नेटवर्क आणि नॉन नेटवर्क भागातील टँकर पुरवठा, जलाशयातील आरक्षणाची टक्केवारी तसेच टाक्यांबाबतची माहिती, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग आदी विषयांचा डेलिगेटस्‌च्या माध्यमातून सभापती पिंटू झलके यांनी माहिती घेतली. ना दुरुस्त बोरवेल तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी संबंधित अधिकारी तसेच मनपा जलप्रदाय विभागाचे आणि ओ.सी.डब्ल्यू.चे डेलिगेट्स उपस्थित होते.

१५० वॉटर एटीएम
शहरातील लोकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी वॉटर एटीएम लावण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात आढावा बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीने ठराव घेण्यात आला. एकूण १५० वॉटर एटीएम लावण्याचा प्रस्ताव आहे. सोबतच सोसायट्यांसाठी वॉटर हेल्थ सेंटरसुद्धा सुरू करण्यात येणार आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रशिक्षण
भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने आणि पाणी साठवणुकीच्या दृष्टीने रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. यासाठी जनजागृती व्हावी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने मनपा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी यावेळी दिले. कविवर्य सुरेश भट सभागृहात प्रशिक्षण घेऊन नंतर लोकांपर्यंत पोहोचावे, असे निर्देश त्यांनी दिले

‘जिओ’ विरुद्ध एफआयआरचे निर्देश
नेहरू नगर झोनअंतर्गत येणाऱ्या डायमंड नगर येथे जिओचे काम सुरू आहे. या कामामुळे पाणीपुरवठ्याची पाईप लाईन फुटली. ही पाईपलाईन दुरुस्त न करून देणाऱ्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जिओविरुद्ध तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी यावेळी दिले.