Published On : Sun, Jul 15th, 2018

बुटीबोरी-हिंग़णा औद्योगिक क्षेत्र आदर्श नगर परिषद म्हणून उदयास यावे – नितीन गडकरी

Advertisement

नागपूर:‘पंतप्रधान आवास योजनेच्‍या माध्‍यमातून बुटीबोरी क्षेत्रात 5 हजार घरे बांधून हा परिसर झोपडपट्टी मुक्‍त करावा. रेमंड कंपनींच्‍या आदर्श विदयालयाची (मॉडेल स्‍कुलची) स्‍थापना बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात झाल्‍यास येथील कामगारांच्‍या मुलांना उच्‍च प्रतीचे शिक्षण मिळेल. याकरिता जागेच्‍या उपलब्‍धतेसाठी राज्‍यशासनाने प्रयत्‍न करावेत .ही दोन्‍ही शहरे आदर्श नगर परिषद म्‍हणून राज्‍यात उदयास यावीत’, अशी आशा केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग व जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज व्‍यक्‍त केली.

केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एन.एच.ए.आय) राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील बुटीबोरी एम.आय.डी.सी. चौकातील ‘टी’- जंक्शनवर बांधल्या जाणा-या उड्डाणपूलाच्‍या भूमीपूजनाप्रसंगी अध्‍यक्ष म्‍हणून ते बोलत होते.

याप्रसंगी उद्घाटक म्‍हणून मुख्ययमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तसेच केंद्रीय श्रम व रोजगार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. संतोषकुमार गंगवार, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार श्री. कृपाल तुमाने , राज्‍यसभा खासदार डॉ. विकास महात्‍मे व हिंगणा क्षेत्राचे आमदार श्री. समीर मेघे, याप्रसंगी प्रामुख्‍याने उपस्थित होते.

बुटीबोरी-हिंगणा या औद्योगिक भागाचे नगर परिषदामध्‍ये रूपांतर झाल्‍यामूळे या क्षेत्रात अनेक उद्योग येत आहेत. वर्ध्‍यापासून नागपूर, काटोल, रामटेक या गावांना जोडणारी ब्रॉडग्रेज मेट्रो रेल्‍वे सेवा सुरू करण्‍याचा करार हा रेल्‍वे मंत्र्याच्‍या उपस्थितीत नागपूरमध्ये 16 जुलै रोजी होणार असून त्या मेट्रोरेल्‍वेचे कोच बनविण्‍याचा कारखानाही बुटीबोरी क्षेत्रात स्‍थापन केला जाणार आहे.

यामुळे येथील स्‍थानिक युवकांना रोजगाराच्‍या संधी मोठया प्रमाणात उपलब्‍ध होतील. या क्षेत्रात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनची महाविद्यालये उभारून आवश्‍यक मनुष्‍यबळ तयार करणे ही प्राथमिकता असली पाहिजे,बुटीबोरी-हिंगणा क्षेत्रातील कामगाराच्या आरोग्‍यविषयक समस्‍

या, निवास व्‍यवस्‍था, पेयजल तसेच महामार्गा जवळच्या अतिक्रमणाच्‍या समस्‍या या सर्वांच्या निराकरणासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्‍न करावेत. राज्य कामगार विमा महामंडळाच्‍या सुमारे 180 कोटी रूपयांच्‍या तरतुदीने बांधले जाणारे हॉस्पिटल हे या क्षेत्रासाठी वरदान असून खाजगी हॉस्पिटल सारख्‍या चांगल्‍या वैद्यकीय सुविधा येत्‍या काळात कामगारांना मिळतील.

बुटीबोरी उड्डणपूलाचे काम न्‍यायालयीन स्‍थगितीमूळे रखडले असतांना स्‍थानिक आमदार श्री. समीर मेघे यांच्‍या पाठपुराव्‍याने आता उड्डाणपूलाच्‍या कार्यातील सर्व अडचणी दूर झाल्‍या असून 850 मिटर लांबीच्या उड्डाणपूलाचे सुमारे 45 कोटी रुपयाचे तरतुदीने दिड महिन्‍यात प्रत्‍यक्ष बांधकाम कार्याला सुरूवात होईल, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालया अंतर्गत राज्‍य कर्मचारी महामंडळाच्‍या वतीने बुटीबोरीतील 5 एकर जागेत सुमारे 30 हजार चौ. मी. वर 200 खाटांची क्षमता असलेले एक सुसज्‍ज असे हॉस्पिटल सुमारे 175 कोटीच्‍या तरतुदीने बांधण्‍यात येणार आहे. यांचे भूमीपूजन श्री. संतोषकुमार गंगवार यांनी रिमोटची कळ दाबून केले .या इस्पितळात कर्मचा-यांचे आरोग्‍य केंद्रस्‍थानी ठेऊन सुमारे 50 बाहय रूग्‍ण विभागाची सुविधा तसेच चिकित्‍सा कक्ष, सिटीस्‍कॅन व एम.आर.आय.ची सुविधा व इतर सुविधा उपलब्‍ध राहणार आहेत.

देशातील सुमारे 40 कोटी कामगार हे असंघटित क्षेत्रातील असून त्‍यांना ई.एस.आय.सी., ई.पी.एफ. (कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी) यासारख्‍या सुविधा मिळत नाहीत. 6 कोटी कामगारानांच वरील सुविधा प्राप्‍त होतात. ही तफावत दूर करण्‍यासाठी केंद्र शासन प्रयत्‍न करत आहे. ई.एस.आय.सी. च्‍या वतीने देशभरातील 300 जिल्‍हयात हॉस्पिटल्‍स कार्यरत असून त्‍यातील 16 महाराष्‍ट्रात आहेत. राज्‍यशासन व ई.एस.आय.सी. या दोघांच्‍या संयुक्त प्रयत्‍नांतून या हॉस्पिटल्‍सचा कारभार चालत असतो असे सांगून नागपूरातील रघुजीनगर येथील हॉस्पिटल हे ई.एस.आय.सी. मार्फत चालवले जाणार आहे, अशी घोषणा श्री. गंगवार यांनी यावेळी केली. उद्योजक व मजदूर या दोघांच्‍या हिताचे श्रम कायदे बनविण्‍याच्‍या दिशेने आपले मंत्रालय कार्यरत आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

महाराष्‍ट्र शासनाने ई.एस.आय.सी. हॉस्पिटलला रस्‍त्‍या लगतच जागा मिळावी यासाठी एम.आय.डी.सी. ला निर्देश दिले आहे यामूळे 1 लाख कामगारांना आरोग्‍य सुविधा मिळणार आहेत. या भागात महामार्गावरील उड्डाणपूल, कामगारांसाठी आवास व्‍यवस्‍था या मागण्‍या प्रलंबित होत्‍या त्या आता पूर्णत्‍वास जात आहेत, असे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मिहान प्रकल्‍प, आंतरराष्‍ट्रीय विमानतळ, रेल्‍वेचा कार्गो प्रकल्‍प तसेच समृद्धी महामार्गामूळे नागपूरशहर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनण्‍याचा मार्गावर आहे.

कामगारांच्‍या वस्‍त्‍या हया गलिच्‍छ राहु नये यासाठी पंतप्रधान आवास योजना व कामगार कल्‍याण महामंडळातर्फे भरीव असे सुमारे 4.5 लक्ष रूपयाचे अनुदानही उपलब्‍ध असून सर्व कामगारांना निवासाची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी राज्‍य व केंद्र सरकार कार्यरत आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

विदर्भ मराठवाड्यातील एम.आय. डी. सी. ना छत्तीसग़डपेक्षा 10 पैसे कमी प्रति यूनिट दराने वीज उपलब्ध करुन दिल्याने उद्योग या विभागाकडे वळत आहेत. अशी माहिती उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.

स्‍थानिक आमदार श्री. समीर मेघे यांनी बुटीबोरी क्षेत्रात कार्य करणा-या उत्‍तर भारतीयांची संख्‍या लक्षात घेता गोरखपूर, बनारसकडे जाणा-या रेल्‍वे गाडयांना बुटीबोरी रेल्‍वे स्‍थानकावर थांबा देण्‍यात यावा अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यासंदर्भात रेल्‍वे मंत्र्याची चर्चा करण्‍याचे आश्‍वासनही यावेळी दिले.

बुटीबोरी येथे राज्य परिवहन मंडळातर्फे बांधल्या जाणा-या बसस्थानकाचे भूमीपूजनही याप्रसंगी करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्‍प संचालक श्री. एन.एल.येवतकर यांनी केले. या कार्यक्रमास एन.एच.आय.य. चे क्षेत्रीय अधिकारी श्री. चंद्रशेखर, ई.एस.आय.सी. चे आयुक्‍त श्री. कटारिया, राज्‍य परिवहन मंडळाचे उपमहाव्‍यवस्‍थापक श्री.पंचभाई , जि.प.अध्‍यक्षा निशा सावरकर, रामटेकचे आमदार मल्लिकार्जृन रेड्डी व परिसरातील नागारिक बहुसंख्‍येने उपस्थित होते.