Published On : Wed, Sep 19th, 2018

भारत पेट्रोलियमच्या नागपुरातील गुरुदेवनगर पंपाची तपासणी

Advertisement

नागपूर : भारत पेट्रोलियमच्या नंदनवन, गुरुदेवनगर येथील पंचशील आॅटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाची कंपनीच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी केली. ग्राहकांना पंपावरून देण्यात येणारे पेट्रोल पाच लिटरच्या मापात अधिकाऱ्यांनी तपासले. या संदर्भात चौकशी केली असता अहवाल कंपनी थेट पंपमालकाला ई-मेलवर पाठविणार आहे. त्यामुळे पंपावर ग्राहकांना पेट्रोल तंतोतंत मिळते वा नाही, याचा अहवाल गुलदस्त्यात आहे.

सर्व काही आॅनलाईन झाल्याचा कंपनीचा दावा आहे. मग पंपावर मिळणारे पेट्रोल तंतोतंत आहे वा नाही, याची माहिती ग्राहकांना तातडीने मिळायला हवी, असे मत पंपावरील ग्राहकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. पंपाचे व्यवस्थापक नीलेश मोहिते यांच्या बातचित केली असता त्यांनी दर तीन महिन्याला कंपनीचे अधिकारी पंपावर येऊन माप आणि येथील सुविधांची तपासणी करीत असल्याचे सांगितले. मुश्तफा हसनजी हे पंपाचे मालक आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे अहवालाचा तपशील कळू शकला नाही. वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारीही पंपाची तपासणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पेट्रोल डिझेलच्या दररोज वाढत्या किमतीमुळे ग्राहक आधीच त्रस्त आहेत. अशातच ग्राहकांना पंपावर पेट्रोल कमी मिळत असेल तर संताप आणखी वाढतो. पंपावर कमी पेट्रोल वा पाणीमिश्रित पेट्रोल मिळत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. अशावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नियम बाजूला ठेवून शहरातील सर्वच पंपाची वारंवार तपासणी करून ग्राहकांना पेट्रोल योग्य मापाने मिळते वा नाही, याचा अहवाल तयार करून प्रकाशित करावा. या संदर्भात पूर्वीही कंपन्यांना आकस्मिक तपासणी करण्याचे पत्र दिल्याचे अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी सांगितले.

कंपनीच्या दक्षता विभागाचे अधिकारी पंपाची आकस्मिक तपासणी करतात. तपासणीचा अहवाल त्यांच्याकडेच असतो. तो आमच्याकडे आल्यानंतर पंपावरील मापाची स्थिती कळते. तपासणीबाबत काहीही सांगू शकत नाही, असे कंपनीचे पंपावरील अधिकारी मुशरफ अहमद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पंपावरील मापांची नियमित तपासणी
नागपुरातील भारत पेट्रोलियम, इंडियन आॅईल, हिंदुस्तान पेट्रोलियमसह खासगी पंपावरील मापाची तपासणी करण्यात येते. विभागाचे अधिकारी तपासणी करतात. पण ग्राहकांच्या तक्रारीनंंतर ही तपासणी वारंवार करण्यात येणार आहे.