Published On : Tue, May 8th, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक: भाजपकडून हेमंत पटलेंना उमेदवारी

Advertisement

मुंबई: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे. भाजप नेतृत्वाच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडत नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भाजपतर्फे पटलेंनाच उमेदवारी मिळणार अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होईल. राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हे सुद्धा संभाव्य उमेदवार असू शकतात. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या दोन्ही पक्षातील पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर १० मे रोजी राष्ट्रवादीचा उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहे.

ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची असल्याने ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे, प्रशिक्षण घेत आहेत. गेल्या दोन दिवसांत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडले. तर शनिवार, ५ मेपासून विधानसभा निहाय मेळावे सुरु आहेत.