Published On : Sun, Jul 25th, 2021

सोशल मिडियावर नगरसेवकांची उडाली भंबेरी : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक सक्रीय, नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती.

नागपूर: पुढील फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक असून आतापर्यंत संपर्कात नसलेले नगरसेवक सोशल मिडियावर भूमीपूजन, उद्‍घाटन आदी फोटो अपलोड करीत आहेत. अचानक सक्रीय झालेल्या या नगरसेवकांची नागरिकांच्या प्रश्नाने भंबेरी उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक नगरसेवक सध्या कटू अनुभव घेत आहेत.

महापालिकेचे १५१ नगरसेवक असून यातील अनेकजण सोशल मिडियावर सातत्याने सक्रीय आहेत. परंतु सोशल मिडियाद्वारे किंवा प्रत्यक्षही नागरिकांच्या संपर्कात नसलेले नगरसेवक आता फेसबुक आदीवर सक्रीय झाले आहेत. परंतु त्यांना नागरिकांच्या संतप्त प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना सोशल मिडियावरही समाधानकारक उत्तरे मिळाली नाही तर नगरसेवकांच्या संकटात वाढ होण्याची शक्यता सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली.

सद्यस्थितीत काही विकास कामांना ब्रेक लागले आहे. त्यामुळे सभागृहात मंजूर ७५ ऑक्सिजन झोन, ७५ प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली. विकास कामे नाही तर याच प्रक्रियेनिमित्त परिसराची पाहणी, भूमीपूजनाचे फोटो आता सोशल मिडियावर दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत नागरिकांच्या संपर्काबाहेर असलेल्या नगरसेवक अचानक सक्रीय झाल्याचे चित्र आहे.

परंतु त्यांचा प्रचारकी थाट सोशल मिडियावर सक्रीय नागरिकांच्या लक्षात आला असून त्यांच्यावर परिसरातील समस्यांबाबत प्रश्नांचा भडीमार होताना दिसत आहे. निवडणूकीच्या आधी उगवले का? आम्हाला कोरोनात बेड मिळत नव्हता, तेव्हा तोंड दाखवलं नाही, इथपासून तर अगदी लायकी काढण्यापर्यंतचे प्रश्न नागरिक नगरसेवकांच्या पोस्टवर उपस्थित करीत आहेत. नागरिकांची समजूत काढण्यासाठी, पुन्हा नाळ जोडण्यासाठी काय करावे? असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.

काही नगरसेवकांनी तर याबाबत आता तज्ज्ञांचा सल्ला घेणेही सुरू केल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडियावर हायटेक प्रचार करताना त्यावरील मतदारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणेही गरजेचे आहे. निवडणुकीत सोशल मिडियाकडे एक दुधारी हत्यार म्हणून बघणं गरजेचं आहे, त्यामुळे सोशल मिडियावर विचारलेल्या प्रश्नांची तिथेच उत्तर देणे अपेक्षित आहे, असे पारसे म्हणाले. अन्यथा नगरसेवकाच्या राजकीय भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

नगरसेवकांच्या पोस्टवरील नागरिकांच्या प्रश्नाला त्यांच्याकडून उत्तर देणे आवश्यक आहे. केवळ एकतर्फी पोस्ट टाकून मोकळे होणे नगरसेवकांच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. कोरोना काळात प्रत्येक नागरिक आता सोशल मिडिया फ्रेंडली झाला. त्यामुळे नगरसेवकांच्या पोस्ट एकतर्फी नकोच. सोशल मिडियातूनही संवाद वाढवून नागरिकांचे समाधान करणे हाच नगरसेवकांपुढे पर्याय आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.

www.ajeetparse.com