Published On : Mon, Apr 2nd, 2018

भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा पुरस्कर्ता गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि समाजातील वंचित-उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात श्री. भाई वैद्य यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न होते. मूल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते याचा एक मानदंड त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने राज्यातील विविध सामाजिक चळवळींचा अध्वर्यू आपण गमावला आहे.