Published On : Wed, Apr 21st, 2021

फसवणूक करणाऱ्या वेबसाईटपासून सावध राहा

महापौरांचे आवाहन : पंतजलीच्या नावावर पैसे उकळणाऱ्या वेबसाईटची केली मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांकडे तक्रार

नागपूर : कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेत त्यांना लुबाडण्याचा गोरखधंदा ‘फेक वेबसाईट’च्या माध्यमातून सुरु असल्याची गंभीर बाब महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची तातडीने शहानिशा करून नागरिकांची लुबाडणूक थांबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

‘पतंजली’ या नावाने एक फेक वेबसाईट तयार करून रुग्णांना त्यांच्या जवळच्या परिसरातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी प्रति दिवस दोन हजार रुपये असे १५ दिवसांसाठी ३० हजार रुपये जमा करावे, अशी जाहिरात या वेबसाइटवरून करण्यात येत आहे.


महापौर दयाशंकर तिवारी यांना ही माहिती मिळताच त्यांनी याबाबत शहानिशा करण्यासाठी तेथे असलेल्या व्हाट्सअप्पवर याबाबत माहिती मागविली. महापौरांनी त्यात त्यांची निकड सांगून आपल्या घराच्या परिसरात बेड हवा असल्याचे सांगितले. समोरून पिन कोडची विचारणा झाली. पिन कोड पाठवताच त्यांना डागा हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देता येईल, त्यासाठी ३० हजार रुपये खात्यात पाठविण्यास सांगितले. डागा हॉस्पिटल हे कोव्हिड रुग्णालय नसल्याने ही बनवाबनवी असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या लक्षात आले. त्याला त्यांनी सांगितले कीं डागा रुग्णालय हा कोविड रुग्णालय नाही तर त्यांनी दुसरा रुग्णालय सांगितले ते सुद्धा कोविड रुग्णालय नव्हते.

त्यांनी परत एका व्यक्तीच्या माध्यामातून वेबसाईटवर संपर्क केला. रेमडेसीविर सोबत बेडची मागणी नोंदविली. लगेच समोरून संबंधित व्यक्तीला फोन आला. अकाउंट नंबर पाठविण्यात आला. ९० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. हा गंभीर प्रकार असून अनेक नागरिकांची यातून फसवणूक होत असेल, ही शक्यता लक्षात घेऊन महापौरांनी तातडीने याबाबत सविस्तर माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिली. या वेबसाईटचे सत्य नेमके काय हे उघडकीस आणून नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनीसुद्धा अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.