| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 17th, 2021

  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारप्राप्त सांची जीवनेचा महापौरांनी केला सत्कार

  नागपूर: भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यात नागपूरची नाट्य-सिने कलावंत सांची जीवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  नागपूर येथील व्हीएमव्ही कॉलेजमध्ये सांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी (१७ मे) रोजी सांची जीवनेचा मनपाचा मानाचा दुपटटा व तुळशीचे रोपटे देवून स्नेहिल सत्कार केला. यावेळी धंतोली झोन सभापती वंदना भगत, क्रीडा समिती सभापती श्री. प्रमोद तभाणे आणि सांची चे वडील श्री. संजय जीवने व आई श्रीमती वंदना जीवने उपस्थित होते.

  नागपूर येथे गतवर्षी निर्मित “पैदागीर” या मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. USA, स्वित्झर्लंड, स्पेन, कॅनडा, UK, तुर्की, चीन, जर्मनी, भारत आणि इतर काही देशांमधून 310 चित्रपटांचा अंतिम नामांकनामध्ये समावेश होता.

  याआधी फिल्म डिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटाचा पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटास पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत. पैदागीर या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय जीवने असून गतवर्षी नागपूर येथील कलावंतांना घेऊन सम्मा दिठ्ठी फिल्म्सने “पैदागीर” चित्रपटाची निर्मिती केली हे विशेष.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145