Published On : Mon, Jan 15th, 2018

विपश्यना समाजासाठी हितकारी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबई: मानवसमाजाला हिंसेकडून करूणेकडे नेण्याची आवश्यकता असून बुद्धाने सांगितलेले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. हा विचार शिकविणारी विपश्यना साधना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण विपश्यनासाधेमुळे जीवनातील तणाव दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात, अधिकाऱ्यांना कामकाजात आणि खेळाडूंना खेळात उत्तम प्रगती करता येते. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला या साधनेमुळे लाभ मिळत असल्याने विपश्यना साधना ही संपूर्ण समाजासाठी हितकारी असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

ग्लोबल पॅगोडा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्या 46 व्या तर इलायची देवी गोयंका यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्ताने आभार दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता कोविंद व इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती पुढे म्हणाले, विपश्यना पद्धती सोबत माझा पंधरा वीस वर्षांपूर्वी परिचय झाला. आज धम्म शिलेचे अनावरण करताना मला आनंद होत आहे. राज्यास अनेक उपलबद्धिमुळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. मात्र अध्यात्म आणि आस्था असलेल्या स्थळांमुळे राज्याला अधिक प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. जागतिक पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या, बुद्धाचा इतिहास प्रदर्षित करणाऱ्या अजिंठाच्या लेण्या याची साक्ष आहे. बुद्धाने सांगितलेला करूणा भाव व्यक्त करणाऱ्या येथील मुर्त्या या जगाला करूणेचा संदेश देतात. आज मानवीसमाजाला करूणेची शिकवण मिळणे आवश्यक आहे.

इगतपुरी येथील धम्म केंद्र, नागपूर येथिल ड्रॅगन पॅलेस व गोराई येथील जागतिक पॅगोडा या क्षेत्रामुळे जागतिक पर्यटक राज्यात आकर्षित होत आहेत. राज्य शासनाने शालेय विद्यार्थी, कारागृहांमधील कैदी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना विपश्यनेसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सयाजी उ बा खिन यांनी विपश्यना विषयीचे ज्ञान शुद्ध रूपात जतन करून ठेवले होते. गोयंका गुरूजींनी ते परत भारतात आणले. त्याच्या कार्याला पुढे नेण्यासाठी पॅगोडाची भूमिका महत्वपूर्ण आहे. आंतरिक ज्ञानाच्या ताकदीमुळे मानवाचे कल्याण साधता येते. मानव कल्याणाचे कार्य या पॅगोडा मार्फत होत आहे. नविन ऊभारण्यात येणाऱ्या धम्मालयासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

केवळ दान दिलेल्या रकमेतून 16 एकर जागेवर पसरलेल्या या ग्लोबल पॅगोडाला गेल्या वर्षी 92 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. नव्या बांधण्यात येणाऱ्या धम्मालयाच्या शिलालेखाचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यातआले.