
नागपूर : बेलतरोडी परिसरात जुन्या हत्या प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कैकाडी नगर झोपडपट्टी परिसरात पाच जणांनी लालसिंग पटेल यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याचा आणि धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पटेल यांच्या उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालसिंग पटेल हे २०२४ मध्ये झालेल्या दिलीप साहू हत्या प्रकरणातील साक्षीदार आहेत. या प्रकरणात ओमप्रकाश पापडे, पियुष लिल्हारे आणि आकाश लिल्हारे हेही आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित तिघे सुमारे सहा महिन्यांपूर्वी जामिनावर कारागृहातून बाहेर आले होते. त्यानंतर ते पटेल यांना पाहून शिवीगाळ करत असल्याचा आरोप आहे.
१९ ऑक्टोबरच्या रात्री पटेल हे घरासमोर असताना पाच आरोपी तेथे आले. त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी एका आरोपीने धारदार शस्त्राने पटेल यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. बचाव करताना त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना आणि स्थानिक नागरिकांनाही तलवार दाखवून धमकावल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पटेल यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवले. त्यांच्या तक्रारीवरून ओमप्रकाश पापडे, पियुष लिल्हारे, आकाश लिल्हारे, गजानन सूर्यवंशी आणि संजय वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत.



